मुंबई: बहुप्रतिक्षीत OnePlus 6T लॉन्च झाला आहे. हा वन प्लस कंपनीचा यंदाच्या वर्षातील दुसरा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीनं अशाच प्रकारे OnePlus 3T आणि OnePlus 5T लॉन्च केला होता. OnePlus 6T मध्ये OnePlus च्या तुलनेत अधिक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, मोठा डिस्प्ले, दीर्घ काळ टिकणारी बॅटरी, अँड्रॉईड 9.0 पाय, स्मार्ट बूट ऑप्टिमायझेशन असे अनेक फिचर्स यामध्ये आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही. त्यामुळे यूएसबी टाईम-सी पोर्ट किंवा ब्लूटूथच्या माध्यमातून यूजर्सला गाणी ऐकता येतील. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हे OnePlus 6T चं वैशिष्ट्य आहे. अशाच प्रकारची सुविधा व्हिवोनं व्ही 11 प्रोमध्ये दिली आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरच्या माध्यमातून OnePlus 6T अवघ्या 0.36 सेकंदांमध्ये अनलॉक होतो, असा कंपनीचा दावा आहे. अमेरिकेत OnePlus 6T ची किंमत 549 डॉलर (जवळपास 40,300 रुपये) आहे. 549 डॉलरमध्ये OnePlus 6Tचं बेसिक मॉडेल मिळेल. यामध्ये 6 जीबी रॅम+ 128 जीबी मेमरी असेल. तर 8 जीबी+128 जीबी मेमरी क्षमता असलेल्या मॉडेलसाठी 579 डॉलर (42,500 रुपये) मोजावे लागतील. OnePlus 6Tच्या सर्वात महागडं मॉडेलची किंमत 629 डॉलर (46,200 रुपये) आहे. या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम+256 जीबी मेमरी मिळेल. भारतात OnePlus 6T ची किंमत नेमकी किती असेल, याची माहिती कंपनीनं दिलेली नाही. मंगळवारी दिल्लीत कंपनीकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये याबद्दलची घोषणा होईल. OnePlus 6T च्या विक्रीला भारतात 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. अॅमेझॉनवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
OnePlus 6T लॉन्च; इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटसह 8 जीबी रॅमची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 11:18 PM