नवी मुंबई : राज्यभर कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर ३३ ते ४० रुपये झाले असून, मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४५ ते ६५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. गुरुवारी ८१४ टन कांद्याची आवक झाली आहे. एक आठवड्यापूर्वी कांदा २५ ते ३५ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर ३३ ते ४० रुपयांवर गेले आहेत. श्रावणामध्येच कांदा दराने उसळी घेतल्याने दसरा, दिवाळीपर्यंत दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वर्षी पाऊस लांबल्याने कांदा लागवड उशिरा झाली आहे. मुंबईत सप्टेंबरच्या सुरुवातीला कर्नाटकमधील कांद्याची आवक सुरू होते. या वर्षी दोन ते तीन आठवडे उशिरा कर्नाटकचा कांदा दाखल होणार आहे. राज्यातील कांदाही उशिरा बाजारात येण्याची शक्यता असल्याने बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.