नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री नोटिफिकेशन काढून ३१ मार्च २०२४ नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ३१ मार्चला कांदा निर्यातबंदीची मुदत होती.
लोकसभा निवडणूक असल्याने येत्या आठ दिवसांनी तरी निर्यातबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून या निर्णयामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मागील महिनाभरापासून कांद्याला कमीत कमी ३०० रु. तर सरासरी बाराशे रुपये दर मिळत आहे.
७ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली होती. कांद्याची आवक घटूनही कांदा भावात घसरण सुरूच आहे. लाल आणि उन्हाळ कांद्याला सरासरी १,४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. परदेशातून भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे; मात्र निर्यातबंदीमुळे त्याचा कोणताही लाभ कांदा उत्पादकांना होताना दिसत नाही.