नवी दिल्लीः देशात कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. महाराष्ट्रातल्या लासलगावमध्ये कांद्याचे दर प्रचंड भडकले आहेत. सरकारनं लागोपाठ कांद्याची आयात होत असल्याचं सांगत दर घसरण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु सरकारच्या या घोषणेच्या दोन दिवसांनंतरच लासलगाव बाजारात कांद्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे जनताही हैराण झाली आहे. सोमवारी कांद्याची घाऊक किंमत 55.50 रुपये प्रति किलोग्राम आहे. ती चार वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.लवकरच हा कांदा 100 रुपयांपर्यंत पोहोचणार असून, ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 ते 80 रुपयांच्या घरात आहेत. गेल्या तीन महिन्यांत कांद्याच्या घाऊक बाजारात दर चारपटीनं वाढले होते. गेल्या वर्षी कांद्याचं उत्पादन कमी झाल्यानं हे दर भडकल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसानंही कांद्याचं उत्पादन प्रभावित झालं असून, यासाठी व्यावसायिकांनी सरकारच्या प्रतिकूल धोरणांना जबाबदार ठरवलं आहे. कृषी उत्पन्न पणन समितीचे अध्यक्ष जयदत्त होल्कर यांनी सांगितलं की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपात पेरण्यात आलेलं पिकांना नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील राज्यात अवकाळी पावसानं कांद्याच्या उत्पादनाला नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात नवा कांदा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
अब की बार कांदा शंभरीपार; सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 4:19 PM