- योगेश बिडवई, मुंबई
किमान निर्यात मूल्यात वाढ करताना कांद्याला आणखी वर्षभरासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत ठेवल्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या लासलगाव बाजार समितीत २ मे रोजी क्विंटलमागे (१०० किलो) १ हजार १०१ रुपये असलेला कांद्याचा सरासरी दर आॅगस्टमध्ये ३ हजार ५५० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे शेतकरी मात्र काहीसे सुखावले आहेत.
साधारणपणे मार्च महिन्यात उन्हाळ कांदा बाजारात आल्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच आॅगस्टनंतर नवे पीक येते. उन्हाळ कांदा टिकावू असल्याने शेतकरी त्याची साठवणूक करतात व तो ठरावीक अंतराने बाजारात आणतात. मात्र यंदा देशात गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळ कांद्याला फटका बसला. परिणामी, उत्पादन घटले. त्यातही साठवणूक केलेल्या कांद्याची प्रत खराब झाली.
महाराष्ट्रानंतर कांद्याचे मोठे उत्पादन होणाऱ्या आंध्र प्रदेश व कर्नाटकात यंदा अपेक्षित पीक आले नाही. त्यामुळे एकीकडे जूननंतर बाजारात मागणी वाढत असताना पुरवठ्यात मात्र वाढ झाली नाही.
लासलगाव बाजार समितीत २०१४ च्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत आवक घटली नसताना भाव मात्र दुप्पट झाले आहेत. आॅगस्ट २०१४ मध्ये क्विंटलमागे असलेला सरासरी १ हजार ५०६ रुपये दर आता सरासरी ३ हजार ४०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर गेल्या काही दिवसांत ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
‘बफर स्टॉक’मुळे दिलासा
केंद्र सरकारने कांद्याचे वाढते दर लक्षात घेऊन तब्बल ५ हजार क्विंटलचा ‘बफर स्टॉक’ केला आहे. नाफेडच्या माध्यमातून सरकारने कांदा खरेदी करून लासलगाव व पिंपळगाव येथे एकूण ५ हजार क्विंटल मालाची साठवणूक केली आहे. येथून दिल्लीला दररोज २ ते ३ ट्रक माल पाठविण्यात येत आहे. त्यामुळे दरवाढीला चाप लागला आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथेही सरकारने शासकीय यंत्रणेमार्फत खरेदी केलेला माल साठविला आहे.
सप्टेंबरनंतर
नवा माल
यंदा सप्टेंबरनंतर बाजारात आंध्र प्रदेश व कर्नाटकातील नवा माल येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पीक येईल. पाऊस कमी असल्याने नाशिक जिल्ह्यात १५ आॅक्टोबरनंतर नवा माल बाजारात दाखल होईल.
नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात कांदे खराब झाले. त्याचवेळी इतर राज्यांत अपेक्षित आवक होत नसल्याने मागणी पूर्ण करणे अवघड झाले आहे. साहजिकच कांद्याचे दर वाढले आहेत. मात्र शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने ते साठवणूक केलेला माल विक्रीला आणत आहेत. त्यातून काही प्रमाणात देशातील गरज पूर्ण होत आहे.
- महावीर भंडारी, कांदा निर्यातदार
कांद्याचे दर २०० टक्क्यांनी वाढले!
किमान निर्यात मूल्यात वाढ करताना कांद्याला आणखी वर्षभरासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत ठेवल्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे,
By admin | Published: August 9, 2015 02:23 AM2015-08-09T02:23:26+5:302015-08-09T02:23:26+5:30