Join us

कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 2:33 PM

आयसीआयसीआय बँकेच्या अहवालानुसार, या नोव्हेंबरमधील पुढील दिवसांत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत.

देशातील भाज्यांचे दर हिवाळ्यात कमी-जास्त होत असतात. हे सहसा दरवर्षी होत असते. नोव्हेंबर महिना सुरु झाला असून गुलाबी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत भाजीपाल्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर भाज्यांच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कांद्याच्या दराबाबत पाहिले तर ते आजही जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा वाढत आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या अहवालानुसार, या नोव्हेंबरमधील पुढील दिवसांत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत. दरम्यान, इतर महिन्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये इतर भाज्यांच्या किमतीत ४.१ टक्क्यांची घसरण झाल्याचे  दिसून येते, ही एक दिलासादायक बाब आहे. बँकेच्या ताज्या मासिक अहवालात असे म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये कोर महागाई दर ६.२१ टक्के होता, जो १४ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर होता. तर सप्टेंबरमध्ये हा दर ५.४९ टक्के होता. 

सप्टेंबरमध्ये खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून आला आणि मंडईतील भाज्यांची आवक कमी झाल्याचा परिणाम त्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दिसून आला. विशेष म्हणजे, आता टोमॅटोचे भाव सुद्धा कमी होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या किमतीवर वाढीचा दबाव राहील, जो संपूर्ण नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

भाजीपाल्यांची आवक वाढलीहिवाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढते, बाजारपेठेतही असा ट्रेंड दिसून येतो. सध्या पालक, कोबी, मेथी यांसारख्या भाज्यांचे भाव सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे ते थोडे वाढलेले दिसत आहेत, परंतु या आठवड्यात ते कमी होण्याची अपेक्षा आहे, कारण पुरवठा खूप मोठा आहे आणि त्यांची मागणीनुसार प्रचंड विक्री अपेक्षित आहे. मात्र, कांदा महाग राहण्याची शक्यता आहे, कारण कांद्याचा ताजा पुरवठा येण्यास वेळ लागणार आहे.

टॅग्स :कांदाव्यवसाय