नवी दिल्ली/ जयपूर/ मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरु झाल्याने घराघरात उत्साह आहे. बाजारपेठांमध्येही लगबग वाढली आहे. घराघरांत खरेदीचे तसेच गोडधोड करण्याचे बेत आखले जात आहेत. परंतु ऐन सणासुदीच्या काळात कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्याला रडवण्याच्या तयारीत आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत ३५ ते ६० रुपये किलो अशी झाली आहे.
कांद्याचा भाव २३ रुपये किलोवरून ३२ रुपये किलोवर गेला आहे. जयपूरच्या मुहाना बाजारात कांद्याचा घाऊक भाव ४० रुपये किलो झाला आहे. सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिसाही यामुळे कापला जाणार आहे. खराब हवामानामुळे यंदा कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)
का वाढत आहेत किमती?
जेथे सरकार घाऊक बाजारात कांदा विकत आहे, तेथे कांद्याचे दर तुलनेने कमी प्रमाणात म्हणजेच ७ ते १० टक्के वाढले आहेत. मुहाना आलू आडत संघाचे अध्यक्ष शिवशंकर शर्मा यांनी सांगितले की, यंदा खरिपातील लाल कांद्याचे पीक एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव वाढ झाली आहे.
उत्पादनातील अंदाजे कपात
२०२२-२३ च्या सरकारी अंदाजानुसार, यंदा गहू आणि डाळींच्या उत्पादनात कपात होणार आहे. गव्हाचे उत्पादन २२ लाख टनांनी घटून ११.०५ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. डाळींचे उत्पादन १५ लाख टनांनी घटून २.६ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये ३२.९७ कोटी टन अन्नधान्य उत्पादन झाले. आधी ते ३३.०५ कोटी टन अनुमानित करण्यात आले होते. तांदूळ, मोहरी आणि मका यांचे मात्र विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.