लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बटाटे, कांदे आणि टोमॅटो यांच्या किमती वाढल्यामुळे घरात बनविल्या जाणाऱ्या जेवणाचा खर्च सप्टेंबर २०२४ मध्ये वाढला आहे. देशांतर्गत मानक संस्था ‘क्रिसिल’ने जारी केलेल्या एका अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये शाकाहारी भोजनाची घरगुती थाळी ११ टक्क्यांनी महाग झाली आहे.
क्रिसिलच्या ‘रोटी, राइस, रेट’ नामक अहवालात ही माहिती दिली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये शाकाहारी भोजन थाळीचा खर्च २८.१ रुपये होता. सप्टेंबर २०२४ मध्ये तो ११ टक्के वाढून ३१.३ रुपये झाला. ऑगस्ट २०२४ मध्ये तो ३१.२ रुपये होता. भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे शाकाहारी थाळी महागली आहे. शाकाहारी थाळीच्या किमतीत भाज्यांचा खर्च ३७ टक्के आहे.
आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. पावसामुळे रबीच्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे.