मुंबई : मध्य रेल्वेची जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात सुरू आहे. बाहेरील देशातही वाहतूक केली जात आहे. लॉकडाऊन काळात राज्यातील कांदा मध्य रेल्वेद्वारे बांगलादेशात पाठविण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने मे, जून आणि १० जुलैपर्यंत ५५ मालगाड्यांमधून वाहतूक करून १ लाख २० हजार टनांहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून आणि तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवले स्थानकांमधून बांगलादेशातील डारसाणा, बेनापोल आणि रोहनपूर येथे पाठविण्यात आला.
नाशिक, मनमाड, कोपरगाव या भागातील शेतकरी कांद्याच्या या निर्यातीमुळे समाधानी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांगलादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून सर्वात पहिली मालगाडी ६ मे रोजी बांगलादेशात निघाली होती. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील डारसाणा येथे पाठविला गेला. मे महिन्यातच कांद्याच्या २७ मालगाड्यांची निर्यात करण्यात आली, जूनमध्ये २३ मालगाड्यांची वाहतूक आणि १० जुलैपर्यंत ५ मालगाड्या (रॅक्स) बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत.
- कांदा वाहतूक करणाऱ्या ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, निफाडहून ११, येवले येथून १०, खेरवाडी येथून ८, नाशिकहून ७, लासलगाव येथून ५ आणि कोपरगाव येथून एक अशा मालगाड्या पाठविण्यात आल्या आहेत.
- नाशिक येथील चांदवड येथे कांद्याची लागवड करणारे प्रकाश सोनवणे यांनी सांगितले की, बांगलादेशात कांद्याची निर्यात व मालवाहतूक केल्याने त्यांना चांगले पैसे मिळू शकले. रेल्वेने लोडिंगसाठी वॅगन उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेचे आभार व्यक्त केले.
- चांदवडमधील धुगाव येथील संतोष जाधव म्हणाले, कोरोना असूनही रेल्वेने केलेल्या वॅगनच्या तरतुदीमुळे सर्व शेतकऱ्यांना कांद्याच्या निर्यातीतून काही पैसे मिळविण्यास मदत झाली.
राज्यातील कांदा मध्य रेल्वेने बांगलादेशात, लॉकडाऊनमध्ये निर्यात
मध्य रेल्वेने मे, जून आणि १० जुलैपर्यंत ५५ मालगाड्यांमधून वाहतूक करून १ लाख २० हजार टनांहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 05:52 AM2020-07-12T05:52:35+5:302020-07-12T05:53:03+5:30