तुम्ही Zomato Pro चा फायदा घेत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही. तुम्ही Zomato Pro या सेवेचे नूतनीकरण करू शकणार नाही. सध्या Zomato कडून ग्राहकांना त्यांच्या 'प्रो' सेवेचे नूतनीकरण किंवा साइन-अप करण्याची परवानगी दिली जात नाहीये. याबाबत युजर्समध्ये नाराजी आहे. ट्विटरवर अनेक युजर्सनी याबाबत तक्रारदेखील केली आहे.
अशाच एका तक्रारीच्या उत्तरात झोमॅटोनेझोमॅटो प्रो ही सेवा नूतनीकरणासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे कंपनी ग्राहकांसाठी नव्या सेवेवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. झोमॅटो प्रो सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना खाद्यपदार्थांवर सूट देण्यात येते. झोमॅटो प्रोच्या अॅक्टिव्ह ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच फायदे मिळत राहतील. मात्र, कंपनी नूतनीकरण आणि नवीन ग्राहकांना याचा लाभ घेण्याची सुविधा देणार नाही, अशी प्रतिक्रिया झोमॅटोच्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिली. झोमॅटोच्या या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
एका युझरने १५ ऑगस्टपासूनच या सेवेचा लाभ घेण्यास समस्या येत असल्याचे म्हटले आहे. तसंच कंपनीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं सांगत, कंपनी केव्हापर्यंत ग्राहकांची फसवणूक करणार आहे, असा सवाल केला आहे. कंपनीच्या या निर्णयावर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. काही युझर्सनं आता आपण स्विगीचा वापर सुरू करणार असल्याचं म्हटलंय.