Join us

ऑनलाईन फूड डिलिव्हरी महागणार; Zomato-Swiggy ने पुन्हा Platform Fee वाढवली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 3:27 PM

Zomato आणि Swiggy ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 20 टक्के वाढ केली आहे.

Zomato-Swiggy : ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप Zomato आणि Swiggy ने पुन्हा एकदा त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. यावेळी प्लॅटफॉर्म फीमध्ये सुमारे 20 % वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे शुल्क 5 रुपये होते, जे आता 6 रुपये करण्यात आले आहे. सध्या कंपनीने ही वाढ फक्त दिल्ली आणि बंगळुरुमध्ये केली आहे, पण लवकरच संपूर्ण देशात लागू केली जाईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरुच्या काही भागात प्लॅटफॉर्म फी 7 रुपये करण्याची योजना सुरू आहे. या भागात कंपनी 7 रुपये प्लॅटफॉर्म फी करण्याबाबत चाचणी करत आहे. सर्व काही ठीक झाले, तर याची अंमलबजावणी केली जाईल. 

दरम्यान, प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीला मोठा फायदा होतो. प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या EBITDA वर सुमारे 6-7 टक्के प्रभाव पडतो. प्लॅटफॉर्म फीमध्ये फक्त 1 रुपयांची वाढ केल्याने, कंपनीच्या EBITDA मध्ये 85-90 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काळात कंपनीची प्लॅटफॉर्म फी 8-9 रुपयांपर्यंत वाढू शकते. मात्र, यामुळे कंपनीच्या ऑर्डरवर परिणाम होईल का, हे पाहणे महत्वाचे आहे. 

झोमॅटो प्लॅटफॉर्म फी टाइमलाइनझोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच प्लॅटफॉर्म शुल्क 2 रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते वाढवून 3 रुपये करण्यात आले. त्यानंतर या वर्षींच्या जानेवारी महिन्यात ही फी 4 रुपये झाली. तर, या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने 5 रुपये आकारण्यास सुरुवात केले. आता कंपनी ही फी 6 रुपये करणार आहे.

स्विगीदेखील प्लॅटफॉर्म फी वाढवत आहेस्विगीने गेल्या वर्षीनेदेखील प्लॅटफॉर्म फी आकारण्यास सुरुवात केली होती. स्विगीनेही त्याची सुरुवात केवळ 2 रुपयांपासून केली होती, जी आता 6 रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये अनेक ग्राहकांना ॲपमध्ये प्लॅटफॉर्म फी 10 रुपये दिसत होती, परंतु चेकआउटच्या वेळी, 5 रुपयांची सूट उपलब्ध होती. म्हणजेच, ग्राहकांना स्विगीवर 5 रुपये भरावे लागत आहेत. 

टॅग्स :झोमॅटोस्विगीव्यवसाय