Join us  

पूर्ण पैसे मिळतील परत! ऑनलाईन फ्रॉड झाला तर 'या' नंबरवर करा कॉल; तात्काळ मिळेल मदत

By राहुल पुंडे | Published: October 02, 2024 4:29 PM

Online Fraud Cyber Crime : देशात जसं इंटरनेटचं स्पीड वाढत आहे, त्याचप्रमाणात सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जागृत राहणे आवश्यक आहे.

Online Fraud Cyber Crime : देशात 4G-5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यापासून सर्व गोष्टी हातातल्या मोबाईलमध्ये आल्या आहेत. आज डिजिटलायझेशनच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध आहेत, लोकांना खिशात पैसे ठेवावे लागत नाहीत, मोबाईलच्या माध्यमातून कामे करता येतात. मात्र, यासोबतच ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. जर कधी तुमच्यासोबत ऑनलाइन फसवणूक झाली तर काय करावे हे माहित असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन फ्रॉड म्हणजे काय?ऑनलाइन फसवणुकीला सायबर क्राईम असं देखील म्हणतात. गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या करुन एखाद्या व्यक्तीला सावज करतात. मग अशा व्यक्तीची आर्थिक किंवा संवेदनशील माहितीचा गैरवापर करुन फसवणूक करतात. यामध्ये स्पॅम मॅसेज, फ्रॉड, संवेदनशील माहितीची चोरी, इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे लुबाडणे यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

ऑनलाइन फ्रॉडपासून कसं दूर रहाल?ओटीपी आणि पिन सुरक्षितपणे ठेवावा. हे तपशील कोणाशीही शेअर करू नयेत.कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधल्या जात आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही ऑफर्सच्या मोहात पडू नये.कुठल्याही मदतीसाठी अधिकृत वेबसाईट्सवरुन माहिती घ्या. थेट गुगलवर सर्च करू नये.

ऑनलाइन फ्रॉड झाल्यास काय करावं?फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर २४ तासांच्या आत तक्रार नोंदवा. तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. जर तुमच्या खात्यातून ऑनलाइन पैसे कापले गेले असतील, तर तुम्ही ऑनलाइन पेमेंट डिडक्शन स्लिपही पोलिसांना द्या.

तुमच्या संमतीशिवाय तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केले गेले असतील, तर तुम्हाला बँकेकडून तुमचे पैसे परत मागण्याचा अधिकार आहे. परंतु, तुमच्या चुकीमुळे किंवा कोणत्याही निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक झाली असेल. तर अशा परिस्थितीत बँक तुम्हाला पैसे परत देत नाही.

जर तुम्ही सायबर क्राईम किंवा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडला असाल तर तुम्ही १९३०, १५५२६० या क्रमांकांवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती देऊ शकता. 

या ठिकाणीही नोंदवू शकता तक्रार

  • सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही लॉगइन करुन तक्रार नोंदवू शकता.
  • जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा
  • ज्या बँक खात्यातील पैसे काढले गेले आहेत, त्या बँक खात्याच्या हेल्पलाईन नंबर किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.

आरबीआयच्या नियमानुसार, जर तुमच्या बँक खात्यातून फसवणूक करून पैसे काढले गेले असतील. अशा परिस्थितीत तुम्ही ३ दिवसांत तक्रार केली तर तुम्हाला कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही. आठवड्याच्या आत तक्रार केली तरी बँक पैसे परत करेल.

टॅग्स :सायबर क्राइमऑनलाइनधोकेबाजीपैसा