सणासुदीच्या हंगामात एका आठवड्यात सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तब्बल ५५ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २६ टक्के वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान ऑनलाइन ऑडर्सची पुन्हा एक लाट येणार आहे. यासाठी सर्व प्लॅटफॉर्म सज्ज आहेत.
सर्वाधिक ऑडर्स मोबाइल फोन, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आहेत. विक्रीत ७५ टक्के वाटा या वस्तूंचाच आहे. नवरात्रोत्सवामुळे घरगुती सजावटीचे सामान, कृत्रिम फुलांचं तोरण यांचा खप अधिक होता. ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स, गेमिंग सहाय्यक उपकरणांच्या खरेदीवर भर दिल्याचं दिसून आलं. फ्लिपकार्ट, मिशो आणि अॅमेझॉन इंडियावर सणासुदीची विक्री २६ सप्टेंबरपासून सुरु झाली. आठवडाभरात झालेल्या विक्रीत वार्षिक आधारे ४० टक्के वाढ झाली. टिअर टू शहरांमधून येणाऱ्या ऑडर्सचा वाटा ४५ टक्के इतका होता.
पंधरा दिवसांतच केली ५५% खरेदी
यंदाच्या सणासुदीच्या हंगामात होणारी जवळपास ५५ टक्के खरेदी २६ सप्टेंबर नंतरच्या पंधरवड्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या हंगामात एकूण ९.७ अब्ज डॉलर्सची ऑनलाइन खरेदी झाली होती.
यंदाच्या हंगामात ही खरेदी वाढून १२ अब्ज डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. यंदा लहान शहरांमधून येणाऱ्या ऑडर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पहिल्या सहामाहीत मोडले सर्व विक्रम
- वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’च्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या देवघेवीच्या व्यवहारांनी सर्व विक्रम मोडले आहेत. जानेवारी ते जून २०२४ या काळात यूपीआयद्वारे ७८.९७ अब्ज व्यवहार झाले. आदल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५२ टक्क्यांनी अधिक आहे.
- पेमेंट तंत्रज्ञान सेवादाता संस्था ‘वर्ल्डलाइन’नं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, मूल्याच्या दृष्टीने पहिल्या सहामाहीत यूपीआय व्यवहारांत ४० टक्के वाढ झाली. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत ११६.६३ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण यूपीआयद्वारे झाली.
- २०२३ च्या पहिल्या सहामाहीत हा आकडा ८३.१६ लाख कोटी रुपये इतका होता. मूल्य आणि देवघेव यादृष्टीने यूपीआय पेमेंटच्या बाबतीत फोनपे सर्वोच्च स्थानी राहिलं. गुगल पे दुसऱ्या, तर पेटीएम तिसऱ्या स्थानी राहिलं.
ईएमआय सुविधेमुळे उत्साह वाढला
- ७०% पेक्षा अधिक टीअर २, टीअर ३ शहरांतील ग्राहकांनी फोन, टीव्ही खरेदी केली.
- ५०% ग्राहकांनी इएमआयवर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप खरेदी केले.