Online Shopping Fraud : शॉपिंगची नावड असणारा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. सेफ्टी पिनपासून सॅटेलाईटच्या डिशपर्यंत आणि किराणा सामानापासून भाजीपाल्यापर्यंत आता सर्वकाही एका क्लिकवर घरपोच मिळत आहे. जगभरातील गोष्टी हातातील मोबाईलद्वारे खरेदी करता येत असल्याने लोकांची ऑनलाईन शॉपिंगला पसंती मिळत आहे. मात्र, ऑनलाइनखरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, सायबर गुन्हेगार ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. यामध्ये अनेकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत काही स्मार्ट टिप्स फॉलो करून तुम्ही अशा फ्रॉडपासून दूर राहू शकता.
फेस्टीव सिझनमध्ये काळजी घ्याअॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वर्षभर फेस्टीवल सिझन आणत असतात. यामध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्टाउंट दिला जातो. अनेकजण या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगचा आनंद लुटतात. यामध्येही फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ सेल आणि अॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’मध्ये वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. मात्र, अशा ई कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटच्या नावाशी साम्य असणारी वेबसाइट तयार करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकारही होत आहेत.
अधिकृत साइट किंवा अॅप्स असल्याची खात्री कराआकर्षक जाहिरात आणि बंपर सूट पाहून कुणालाही खरेदी करण्याचा मोह होतो. अशात ग्राहक कुठलीही शहानिशा न करता अनोळखी साइटवरूनही खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बहुतेकदा या वेबसाइट्स म्हणजे एक प्रकारचा ट्रॅप असतो. अशात तुम्ही ऑनलाईन पेमेंट तर करता मात्र तुमच्यापर्यंत वस्तू पोहचत नाही. किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती चोरुन त्याचा गैरवापर करुन पैशांचा फ्रॉड केला जातो. ही सर्व डोकेदुखी टाळण्यासाठी अधिकृत वेबसाईट्सवरुन खरेदी करा.
https तपासा ऑनलाइन खरेदी करताना अनेकदा आपल्याला https आणि http मधील फरक लक्षात येत नाही. अनेकजणांना तर असं काही असतं हेही माहित नसेल. अशा लोकांसाठी https साइटवर ‘S’ सुरक्षा चिन्ह म्हणून वापरले जाते. अशा परिस्थितीत http साइटऐवजी https साइटवरून खरेदी करा. याशिवाय खरेदी करताना दुकानदाराचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल याचाही तपास केलेला चांगला.
पेमेंट करताना सावधान ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर सध्या पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकरणात व्हेरिफाईड बाय व्हिसा किंवा मास्टरकार्डचा सुरक्षित कोड वापरणे कधीही चांगले. या पेमेंट सिस्टमद्वारे खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
नियम व अटींकडे दुर्लक्ष करू नका
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचायला विसरू नका. बऱ्याचदा आकर्षक ऑफर्स पाहून आपण खरेदी करतो. मात्र, डिलिव्हरी शुल्क किंवा कोणतेही छुपे शुल्क पाहत नाहीत. परिणामी अनेकदा वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त पैसेही मोजावे लागू शकतात.
डिलिव्हरी बॉयसमोरच ऑर्डर तपासाऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत तुमची ऑर्डर डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच पॅकेट उघडून ते तपासा आणि काही त्रुटी आढळल्यास डिलिव्हरी बॉयसोबत सामानाचा फोटो घ्या. याचा तुम्हाला तक्रार दाखल करण्यात आणि पैशांचा दावा करण्यासाठी मदत होईल.