दिल्लीउच्च न्यायालयानं अॅमेझॉनच्या युनिटला ३४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'बेवर्ली हिल्स पोलो क्लब'चे ट्रेडमार्क उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आलाय. अॅमेझॉनच्या भारतीय वेबसाईटवर याच ब्रँडचे कपडे विकले जात होते. बुधवारी न्यायालयाच्या आदेशात हा निकाल देण्यात आला. भारतीय वकिलांनी हा निकाल ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. ट्रेडमार्क प्रकरणात यापूर्वी कधीही अमेरिकन कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आला नव्हता. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा भारतातील अँटीट्रस्ट चौकशीत अॅमेझॉनवर आपल्या निवडक विक्रेत्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅमेझॉनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही ट्रेडमार्क केस २०२० मध्ये बेवर्ली हिल्स पोलो क्लब (BHPC) हॉर्स ट्रेडमार्कची मालकी असलेल्या लाइफस्टाइल इक्विटीजने सुरू केली होती. अॅमेझॉनच्या भारतीय शॉपिंग वेबसाइटवर हाच लोगो असलेले कपडे कमी किमतीत विकले जात असल्याचा आरोप कंपनीनं केला आहे. हा बनावट ब्रँड अॅमेझॉन टेक्नॉलॉजीजचा असून तो अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर विकला जात असल्याचं न्यायालयानं म्हटलं. दरम्यान, अॅमेझॉनच्या भारतीय युनिटनं कोणत्याही गैरप्रकारावर नकार दिला. अमेरिका आणि भारतातील कंपनीच्या प्रवक्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
का आहे हा ऐतिहासिक निर्णय?
"भारतातील ट्रेडमार्क उल्लंघन खटल्यात मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम आहे. या भारतीय निर्णयाची अमेरिकी न्यायालये कशी अंमलबजावणी करतात हे पाहावं लागेल." असं इंडियाज एरा लॉचे भागीदार आदित्य गुप्ता म्हणाले.
२०१९ मध्ये लंडनमधील लाइफस्टाइल इक्विटीजनं अॅमेझॉनवर असेच आरोप केले होते. गेल्या वर्षी, अॅमेझॉनच्या एका निर्णयाच्या विरोधातील अपील फेटाळलं होतं. यात अमेरिकन वेबसाइटवर ब्रिटिश ग्राहकांना अधिक टार्गेट करण्यासाठी ट्रेडमार्कचं उल्लंघन केल्याचं यात म्हटलं आहे.