Nithin Kamath Zerodha : ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोदाचे (Zerodha) संस्थापक नितीन कामत (Nithin Kamath) बऱ्याच काळानंतर लोकांसमोर आले आहेत. नितीन कामत यांना तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. खरं तर नितीन कामथ झिरो वन फेस्टमध्ये (Zero1 Fest) सहभागी झाले होते. याचा फोटो शेअर करत आपली प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचं त्यांनी म्हटलं.
नितीन कामथ हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत आहे. झिरो १ फेस्टमध्ये हेल्थ आणि वेल्थ बद्दल बोलताना," असं त्यांनी आपला फोटो शेअर करत म्हटलंय. त्यांच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आणि लाईक्स आले आहेत.
Slowly getting back to normal. 😀
— Nithin Kamath (@Nithin0dha) April 29, 2024
At the Zero1 fest, talking about health and wealth with @nasdaily, JC @FITTRwithsquats, and @twitellectual. pic.twitter.com/CFOIdlOwZD
सोशल मीडियावर शुभेच्छा
नितीन कामथ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर आल्यानंतर व्हायरल झाली. काही तासांतच या पोस्टला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेत. या पोस्टवर लोकांच्या अनेक कमेंट्सही येत आहेत. "ऑल द बेस्ट नितीन, तुम्हाला स्टेजवर पाहून खूप छान वाटतंय." असं एका युझरनं म्हटलं. आणखी एकाने लिहिलं की, "तुम्हाला परतताना पाहून खूप आनंद झाला." झिरो वन फेस्टच्या वेबसाईटनुसार, पैसा आणि संपत्तीच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात येणारं हे जगातील पहिलंच फेस्टिव्हल आहे. २८ एप्रिल रोजी बंगळुरूत याचं आयोजन करण्यात आलं होतं.