Join us  

खिशात ३० रुपये, हाती सिमकार्ड्स; २१ वर्षांच्या मुलानं अशी उभी केली कोट्यवधींची कंपनी OYO

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 1:45 PM

OYO Success Story: १७ व्या वर्षी त्यानं आपलं कॉलेज सोडलं; १९ वर्षी व्यवसाय सुरू केला, पाहा कशी होती ओयोची सुरुवात.

OYO Success Story: असं म्हटलं जातं की, जर एखाद्याचा हेतू चांगला असेल आणि आत्मविश्वास असेल तर माणूस त्याचं स्वप्न सत्यात बदलू शकतो, रितेश अग्रवाल हे त्याचच एक उत्तम उदाहरण आहे. रितेश अग्रवालनं OYO हॉटेल्स आणि होम्सच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. OYO चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनी जगभरातील लोकांचा बजेट अॅकोमोडेशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतातील एका छोट्या शहरापासून ते ग्लोबल हॉस्पिटॅलिटी उद्योगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

रितेशचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ रोजी ओडिशातील कटक येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. व्यवसायाची आवड जोपासण्यासाठी त्यानं वयाच्या १७ व्या वर्षी कॉलेज सोडलं. दृढनिश्चय आणि तंत्रज्ञानात अधिक स्वारस्य असलेल्या रितेशनं एका प्रवासाला सुरुवात केली आणि त्या प्रवासानं त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

OYO ची सुरुवात२०१३ मध्ये, वयाच्या १९ व्या वर्षी, रितेश अग्रवालनं ओरावेल स्टेज लाँच केलं. हा एक असा प्लॅटफॉर्म होता जो प्रवाशांना परवडणारं अॅकोमोडेशन देत होता. बजेट हॉटेल क्षेत्रातील संधी ओळखून त्यानं २०१५ मध्ये आपल्या व्यवसायाचं OYO रूम्स म्हणून रिब्रँडिंग केलं. ही संकल्पना साधी पण क्रांतिकारी होती. गुणवत्ता आणि कस्टमर एक्सपिरिअन्सवर लक्ष देऊन परवडणाऱ्या रुम्स पुरवायच्या होत्या.

ग्लोबल एक्सपान्शनरितेश अग्रवालच्या नेतृत्वाखाली OYO हॉटेल्स अँड होम्सनं संपूर्ण भारतामध्ये आपल्या कामाचा झपाट्यानं विस्तार केला आणि नंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही एन्ट्री केली. कंपनीचं अनोखं बिझनेस मॉडेल, ज्यामध्ये हॉटेल मालकांसोबत भागीदारी करणं आणि त्यांना टेक्नॉलॉजी ऑपरेटेड प्लॅटफॉर्म प्रदान करणं हे होतं. त्याच्या या मॉडेलनं खूप लोकप्रियता मिळवली. OYO चा विस्तार आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेत झाला. यानंतर ते जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनपैकी एक बनले.

अनेक आव्हानंरितेशला या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कोरोनाच्या महासाथीदरम्यान OYO सह संपूर्ण हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मोठा फटका बसला. परंतु रितेश अग्रवालच्या गतिमान आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेनं कंपनीला या मोठ्या वादळाचा सामना करण्यापासून वाचवलं आणि ते अधिक मजबूत झालं.

आधी झाला विरोधआई-वडिलांना रितेशला इंजिनियर बनवायचं होतं आणि म्हणून त्यांनी दहावी पास झाल्यावर लगेचच त्यांना कोटा येथे शिकायला पाठवलं. पण रितेश यांना तिकडे आवडलं नाही आणि ते कोटाहून दिल्लीला गेले. रितेश यांना घरातही जोरदार विरोध झाला. पण त्यांनी आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या गोष्टींची पर्वा केली नाही, जेव्हा तो दिल्लीला गेलो तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ३० रुपये होते. वयाच्या १९ व्या वर्षी मोठ्या व्यवसायाचे स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं सोपं नव्हतं, पण त्यांनं हार मानली नाही.

रितेशला उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर सिमकार्ड विकावी लागली. याचदरम्यान त्याला केलेल्या मेहनतीचे फळ मिळालं आणि २०१३ मध्ये त्याची थिएल फेलोशिपसाठी निवड झाली. या फेलोशिपमध्ये त्याला ७५ लाख रुपये मिळाले. रितेशच्या आयुष्याला तेथेच कलाटणी मिळाली आणि त्यांनी यानंतर स्टार्टअप सुरू केले. याच स्टार्टअपचं नाव बदलून पुढे ओयो रुम्स करण्यात आलं आणि अवघ्या ८ वर्षांत ही कंपनी ७५ हजार कोटींची झाली.

टॅग्स :व्यवसाय