ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - चीनची इंटरनेट सेवा देणारी कंपनी अलीबाबा लवकरच भारतात मोफत इंटरनेट सेवा देण्याची शक्यता आहे. भारतातील टेलीकॉम कंपन्या आणि वाय-फाय सेवा देणा-या कंपन्यांसोबत अलीबाबा कंपनी याबाबत चर्चा करत असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
अलीबाबा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जॅक हुआंग यांनी बिजनेस इनसाइडर इंडियाला याबाबत माहिती दिली आहे. टेलीकॉम कंपन्या आणि वाय-फाय सेवा देणा-या कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. डेटाची किंमत कमी करण्यावर आणि चांगली कनेक्टिव्हिटी देण्यावर आमचा भर आहे. आम्ही आमच्या प्लॅनवर अजून काम करत आहोत. याबाबत भविष्यातील भागीदारांसोबत चर्चा सुरू आहे. भारतात सर्व राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये अडचण नसून ठरावीक राज्यांमध्येच अडचण आहे अशा राज्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. तसेच सध्या इंटरनेट वापरत असलेल्या ग्राहकांचा आम्ही अभ्यास करणार आहोत, असं ते म्हणाले.
भारतात मोफत इंटरनेट देणारी अलीबाबा ही पहिली कंपनी नसेल याआधी फेसबुकने Internet.org द्वारे असा प्रयत्न केला होता. याशिवाय सध्या जिओ मोफत इंटरनेट सेवा भारतात देत आहे.