Join us

उदारीकरणानंतरच अर्थव्यवस्थेला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:00 AM

उदारीकरणानंतरच भारतीय अर्थव्यवस्था जलदगतीने विकसित होऊ लागली.

नवी दिल्ली : उदारीकरणानंतरच भारतीय अर्थव्यवस्था जलदगतीने विकसित होऊ लागली. या उदारीकरणाला भांडवली बाजाराची जोड मिळाली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. त्यात राष्ट्रीय शेअर बाजाराची (एनएसई) भूमिका महत्त्वाची होती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.एनएसईच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात बुधवारी राजधानीत झाली. १९९१च्या उदारीकरणानंतर १९९४मध्ये डॉ. सिंग यांनीच केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने हा शेअर बाजार सुरू केला होता. त्याचा संदर्भ डॉ. सिंग यांनी या कार्यक्रमात अतिथी या नात्याने नमूद केला.राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी या वेळी विशेष संदेश पाठवला. जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजारावर विश्वास आहे. जागतिक पातळीवर हा विश्वास निर्माण करण्यात एनएसईची भूमिका मोलाची आहे. एनएसईमुळे गुंतवणूकदारांना स्थिर व पारदर्शक भांडवली बाजार उपलब्ध झाला आहे. एनएसई हा भारताच्या आर्थिक विकासाचा अविभाज्य घटक आहे, असे मत राष्टÑपतींनी संदेशात व्यक्त केले. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकारी कंपनी किंवा विभाग असो वा खासगी क्षेत्र, या सर्वांनाच निधी उभा करण्यासाठी भांडवली बाजार हा अत्यंत सक्षम पर्याय आहे.एनएसईमुळे भांडवली बाजारात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, एनएसईचे अध्यक्ष अशोक चावला, सीईओ विक्रम लिमये यांनीही या वेळी विचार मांडले.>भारतातील केवळ २ टक्के लोकांची गुंतवणूकएनएसईसारखा विश्वासार्ह मंच गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतानाही भारतातील फक्त दोन टक्के लोकांनीच भांडवली बाजारात गुंतवणूक केली आहे. हेच प्रमाण अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये ४० टक्के इतके आहे. त्यामुळे येत्या काळात एनएसईने याबाबत काम करावे, असे आवाहन निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले.

टॅग्स :अर्थव्यवस्था