नवी दिल्ली :रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर तिकीट प्रतीक्षा यादीत असतानाच तिकिटाचे पैसे खात्यातून कपात होतात. नंतर हे पैसे परत मिळावेत यासाठी प्रवाशांना डोकेदुखी सहन करावी लागते. यावर तोडगा म्हणून ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने नवे फिचर आणले आहे. आता तिकीट कन्फर्म झाले, तरच पैसे कपात होतील.
या ॲप आणि वेबसाइटवर ‘पेमेंट गेटवे’च्या पर्यायात हे फीचर सर्वांत वरच्या बाजूला दिसेल. ‘आय पे ऑटो पे’ असे त्याचे नाव आहे. याद्वारे बुक केल्यानंतर तात्काळ पैसे भरण्याची गरज नाही. यात पैसे केवळ ब्लॉक होतील. कन्फर्म न झाल्यास रिफंडची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
कसे आहे फीचर?
हे फीचर ‘आयपीओ’मध्ये पैसे गुंतविल्याप्रमाणे काम करते. आयपीओसाठी गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराचे पैसे त्याच्याच खात्यावर ब्लॉक होतात. समभाग मिळाल्यास पैसे कंपनीच्या खात्यावर वळते होतात. न मिळाल्यास गुंतवणूकदाराच्या खात्यावर कायम राहतात. याच पद्धतीने ‘आयआरसीटीसी’चे ऑटो फीचर काम करेल.