Join us

...तरच बँकांमधील ठेवी होतील सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:23 AM

ज्यावेळी एखादी बँक अवसायनात जाते त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावांवरील नियमांनुसार ठेव विम्यास पात्र असणाऱ्या रकमेमधून त्यादिवशी त्या खातेदारांकडून बँकेस येणे असलेली रक्कम वजा करूनच संबंधित खात्याची देय रक्कम निश्चित केली जाते.

- विद्याधर अनास्करबँकिंगतज्ज्ञठेव ठेवताना एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या अधिकारात ठेव ठेवल्यास प्रत्येक ठेवींना ५ लाखांपर्यंत ठेव विमा महामंडळाचे संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीने नावावर ठेव ठेवत असताना एखाद्या फर्मचा भागीदार म्हणून, कंपनीचा संचालक म्हणून अथवा हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता म्हणून, अज्ञान व्यक्तीचा पालक म्हणून अशा निरनिराळ्या अधिकारात ठेवलेल्या ठेवींना स्वतंत्रपणे विमा संरक्षण मिळते. येथे व्यक्ती एकच असली, तरी कायद्याने अस्तित्वात आलेल्या निरनिराळ्या संस्थांच्या वतीने त्याच व्यक्तीने ठेवलेल्या ठेवींना स्वतंत्र मानले जाते. त्यामुळे अशा ठेवींना विम्याचे संरक्षण स्वतंत्रपणे प्राप्त होते.व्यक्तिगत मालकीचे खाते म्हणजे एकाच व्यक्तीच्या मालकीचे खाते होय. यामध्ये त्या व्यक्तीच्या व्यवसायाच्या प्रोप्रायटरशीप खात्यांचा जसा समावेश होतो. तसेच त्या व्यक्तीचे प्रतिनिधी, वारसदार, पालक, कस्टेडियन इ. सर्व खात्यांचाही समावेश होतो. अशा खात्यांना वेगवेगळ्या अधिकारात धारण केलेली खाती असे न समजता व्यक्तिगत मालकीची खाती असे मानण्यात येऊन, या सर्व खात्यांवरील एकत्रित रकमेस ५ लाखांपर्यंत ठेव विमा महामंडळाचे संरक्षण मिळते.एकाच व्यक्तीच्या नावावरील, परंतु वेगवेगळ्या अधिकारांमधील ठेवींना स्वतंत्र विमा संरक्षण प्राप्त होते. तसेच संयुक्त खात्यावरील नावांचा क्रम बदलून ठेवलेल्या ठेवींना स्वतंत्रपणे ५ लाखांचे विमा संरक्षण प्राप्त होते. उदा. अ, ब, क या व्यक्तींनी याच क्रमाने एखाद्या बँकेतील विविध शाखांमधून बचत, चालू, मुदत ठेवी अशा प्रकारची खाती उघडली असली, तरी या सर्व खात्यांना एकत्रित ५ लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध होईल. परंतु या संयुक्त नावांवरील क्रम बदलून खाती उघडल्यास प्रत्येक खात्याला स्वतंत्रपणे ५ लाखांची मर्यादा लागू होते. नावांचा क्रम बदलून तब्बल सात वेगवेगळी खाती उघडता येऊ शकतात.ज्यावेळी एखादी बँक अवसायनात जाते त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावांवरील नियमांनुसार ठेव विम्यास पात्र असणाऱ्या रकमेमधून त्यादिवशी त्या खातेदारांकडून बँकेस येणे असलेली रक्कम वजा करूनच संबंधित खात्याची देय रक्कम निश्चित केली जाते. बँक अवसायनात निघाल्यानंतर अवसायकाने प्रत्येक ठेवीदारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणाºया सर्व कागदपत्रांसह विमा महामंडळाकडे दावा दाखल करायाचा असतो. खातेदार परस्पर विमा महामंडळाकडे दावा दाखल करू शकत नाही. असा दावा दाखल केल्यापासून दोन महिन्यांच्या आत प्रत्येक ठेवीदारास त्याची रक्कम देणे विमा महामंडळावर कायद्याने बंधनकारक आहे. अडचणीतील अथवा अवसायनात गेलेल्या बँकेचे दुसºया बँकेमध्ये विलीनीकरण झाल्यास विलीनीकरण करून घेणाºया बँकेस विमा महामंडळ विलीनीकरण करून घेतलेल्या बँकेतील प्रत्येक ठेवीदाराची पूर्ण रक्कम किंवा ५ लाख, यापैकी कमी असणारी रक्कम तरलता साहाय्य म्हणून देते. विलीन करून घेतलेल्या बँकेच्या बुडीत खात्यांमधून रक्कम वसूल होईल त्यावेळी अशी रक्कम प्रथम विमा महामंडळाला द्यावी लागते.विमा महामंडळाकडे नोंदणी करणे प्रत्येक बँकेवर बंधनकारक आहे. त्यामुळे बँकेने विमा महामंडळाकडे नोंदणी केली आहे का ? अथवा विम्याचा हप्ता भरला आहे का ? इत्यादी गोष्टींची चौकशी करण्याची गरज नाही. जोपर्यंत बँक सुरू आहे तोपर्यंत या गोष्टींची पूर्तता बँकेने केली आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही. बँकांमधील ठेवींना ५ लाखापर्यंतच विमा संरक्षण असले तरी बँकांमधील एकूण ठेवींवर विम्याचा हप्ता आकारला जातो. त्याचा हप्ता भरण्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची असते. त्याची तोशिष ठेवीदारांना लागत नाही.

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र