ChatGPT Ghibli Trend: सध्या सोशल मीडियावर घिबलीचे फोटो ट्रेंड होत आहेत. जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युजर सध्या चॅटजीपीटीच्या माध्यमातून आपली घिबली इमेज तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. इन्स्टाग्रामपासून फेसबुकपर्यंत सगळीकडे आता फक्त लोकांचे घिबलीचेच फोटो दिसत आहेत. घिबलीची क्रेझ इतकी वाढली की ३० मार्च रोजी चॅटजीपीटीचा सर्व्हरही क्रॅश झाला होता. मात्र, घिबली ट्रेंडमुळे चॅटजीपीटीला मोठा फायदा झालाय.
तासात चॅटजीपीटीशी १० लाख नवे युजर्स जोडले
सध्या बहुतांश लोक चॅटजीपीटीसह आपली गिबली इमेज तयार करण्यात गुंतलेले असतात. अशा तऱ्हेनं चॅटजीपीटीच्या युजर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. चॅटजीपीटीच्या ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना याबाबत माहिती दिली. "आम्ही २६ महिन्यांपूर्वी चॅटजीपीटी लाँच केले होतं, परंतु यापूर्वी असे कधीच पाहिलं नाही. सॅम ऑल्टमन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितलं की, गेल्या १ तासात १ मिलियन युजर्स जोडले गेले आहेत.
४० बिलियन डॉलर्सची कमाई
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, घिबली ट्रेंडमुळे इतक्या मोठ्या संख्येनं लोक आता या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत की यामुळे सॉफ्टबँक समूहाच्या नेतृत्वात गुंतवणूकदारांकडून ४० बिलियन डॉलर्स जमवले, ज्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन दुप्पट होऊन ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला.
अनेक जण गुंतवणूकीस तयार
ब्लूमबर्गनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मासायोशी सोनची सॉफ्टबँक फंडिंग राऊंडमध्ये आघाडीवर आहे, ज्यात गुंतवणूकदार सिंडिकेटकडून ७.५ अब्ज डॉलर आणि २.५ अब्ज डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, कोट मॅनेजमेंट, अल्टिमेटर कॅपिटल मॅनेजमेंट आणि थ्राईव्ह कॅपिटल या गुंतवणूकदारांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. २०२५ च्या अखेरीस ओपनएआयमध्ये आणखी ३० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, ज्यात सॉफ्टबँककडून २२.५ अब्ज डॉलर आणि सिंडिकेटकडून ७.५ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. ओपनएआयनं २६ मार्च रोजी जगभरातील चॅटजीपीटी प्लस, प्रो आणि टीम्स वापरकर्त्यांसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केलं. बघता बघता ते इतकं फेमस झालं की मोठ्या संख्येने युजर्स त्याचा वापर करू लागले.