लोकमत न्यूज नेटवर्क : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला असतानाच, भारताला ‘संकटात संधी’ या न्यायाने गहू निर्यातीतून मोठा लाभ होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदतच होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनासह अनेक वस्तूंचे दर जागतिक बाजारात वाढले आहेत. त्यात गव्हाचाही समावेश आहे. इंधन दरवाढीचा भारताला फटका बसला असतानाच, गव्हाच्या दरवाढीचा फायदा होत आहे. कारण सरकारने गव्हाच्या निर्यातीत वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
भारत दुसऱ्या क्रमांकाचा
गहू उत्पादक देश
एप्रिल २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत भारताने ६२ लाख टन गव्हाची निर्यात केली आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय गव्हाला जगभरात मोठी मागणी आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारत ७० लाख टन गव्हाची निर्यात करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी हीच निर्यात १०० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता अन्न सचिवांनी व्यक्त केली आहे.
n भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. तथापि, निर्यातीच्याबाबतीत भारत अद्याप फारच मागे राहिला आहे. n संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या आकडेवारीनुसार, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश मिळून जगातील एक चतुर्थांश गव्हाची निर्यात करतात.