नवी दिल्ली : आधारच्या गोपनीयतेत सुधारणा करण्याच्या सूचनांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. आधार ही विकसित होत असलेली प्रणाली आहे. ती अजून अंतिम नाही, असेही त्यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जेटली यांनी सांगितले की, वैयक्तिक गोपनीयतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निकाली निघाला आहे, अशी अपेक्षा आहे. आधारच्या गोपनीयतेची चौकट मजबूत करण्याचा मुद्दा मात्र नेहमीच खुला आहे. ही चौकट मजबूत करण्यासाठी न्यायालयाकडून, लोकांमधून अथवा संसदेत एखादी सूचना आल्यास ही बाब आधारसाठी प्रतिकूल मानता येणार नाही, असे मला वाटते. जेटली म्हणाले की, आधार ही विकसित होत असलेली संकल्पना आहे. आधारचा अंतिम शब्द अद्याप लिहिला गेलेला नाही, याबाबत मला खात्री आहे.आधारला मजबूत करण्याच्या मुद्द्यावर सरकार नेहमीच खुले राहील. आधारच्या सुरक्षेसाठी तुम्हाला पुरेशा ‘फायरवॉल’ उभाराव्याच लागतील. मात्र, त्याचवेळी सार्वजनिक हित हे वैयक्तिक हिताच्या नेहमीच वर राहिले पाहिजे.वैयक्तिक गोपनीयतेच्या मुद्द्यावर आधारला मोबाइल क्रमांक व बँक खाती जोडण्यास मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकांची सुनावणी सुरू आहे. आधारचा गैरफायदा घेतला जाण्याचा धोकाही दूरसंचार कंपनी एअरटेलने केलेल्या उचापतीच्या प्रकरणानंतर समोर आला आहे.>आधीच्या सरकारने जे काही केले, त्यापेक्षा आताच्या सरकारने अधिक चांगले केले, असे मला म्हणायचे नाही. तथापि, आधार जोडणीमुळे सरकारची मोठी बचत झाली आहे. सरकारची बचत सातत्याने वाढत आहे. पुढेही ती वाढत राहील.- अरुण जेटली, वित्तमंत्री
आधारच्या गोपनीयतेत सुधारणा करण्याचा पर्याय खुला - जेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:44 AM