नवी दिल्ली : भारत सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉव्हरिन गोल्ड बाॅण्ड) योजनेची पुढील मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आणली जाणार असून, १६ फेब्रुवारी रोजी ती बंद होईल. या योजनेद्वारे सरकार बाजारभावानुसार रोख्याच्या स्वरूपात सोन्याची विक्री करते. या योजनेतील गुंतवणुकीची हमी भारत सरकार देते.
भारतीय रिझर्व्ह बँक या रोख्यांची विक्री करते. २०१५ मध्ये ही योजना सुरू झाली. सबस्क्रिप्शन आणि आधारच्या आधीच्या ३ दिवसांत सोन्याचा जो भाव असतो, त्याच्या सरासरीनुसार सोन्याची किंमत निश्चित केली जाते. ऑनलाइन खरेदी केल्यास ५० रुपये प्रति १० ग्रॅम अशी सूट मिळते.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नियावलीनुसार, सार्वभौम सुवर्ण रोख्यांत गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी १ ग्रॅम सोने खरेदी करावे लागते. एक व्यक्ती जास्तीत जास्त ४ किलो, हिंदू संयुक्त कुटुंब ४ किलो आणि विश्वस्त संस्था २० किलो सोने खरेदी करू शकते.
सार्वभौम सुवर्ण रोख्यांची परिपक्वता ८ वर्षांनी होते. पाचव्या वर्षी गुंतवणूक काढण्याची मुभा असते. या योजनेत गुंतवणूकदारास २.५० टक्के व्याज मिळते. नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ते खरेदी करता येतात.
कोठे करायची खरेदी?कोणत्याही बँकेतून हे रोखे खरेदी करता येतात, तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल), क्लीअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआयएल), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्याकडून खरेदी केली जाऊ शकते.