जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडीट सोसायटीत ठेव तारण कर्ज प्रकारात बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे राज्यस्तरीय लेखा समितीने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. संस्थापक प्रमोद रायसोनी यांनी घेतलेले कर्ज आणि परतफेडीच्या प्रक्रियेवर या समितीने आक्षेप नोंदविले आहेत.
बीएचआर संस्थेचे संस्थापक संचालक प्रमोद रायसोनी यांचे स्वत:ची व त्यांच्याशी संबधित अन्य कर्ज खाते असून त्या खात्यांवरील व्यवहाराची समितीने तपासणी केली असता काही नियमबाह्य गोष्टी समोर आल्या आहेत. प्रमोद रायसोनी यांचे घोले रोड, पुणे शाखेत कॅश क्रेडीट कर्ज खाते असून त्यांची खाते उताऱ्यामधील मंजूर मर्यादा ८० लाख आहे. १ एप्रिल २००८ रोजी या खात्यावर येणे बाकी २४ लाख ७४ हजार ०४१ रुपये एवढी होती. तर ३१ मार्च २००९ रोजी येणे बाकी ३९ लाख ३३ हजार ५४० रुपये एवढी आहे. ३ एप्रिल २००८ रोजी या खात्यामधून युटीआय बँकेच्या खात्यामधून १ कोटी६० लाख नावे नोंदविली आहे. या रकमेचा धनादेश पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकरण यांच्या नावे दिलेला आहे. सदर कर्ज हे व्यावसायीक स्वरूपाचे नसून प्रमोद रायसोनी यांना व्यक्तीगतरित्या मंजूर केले आहे.
व्यावसायीक स्वरूप व त्या संबधित आवश्यक ती कागदपत्रे शाखेत उपलब्ध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. रायसोनींच्या कर्जखात्यात १ कोटी २९ लाखांची रक्कम जळगाव शाखेतून रायसोनी यांच्या खात्यावर २००८/०९ या वर्षामध्ये ३ एप्रिल २००८ रोजी १ कोटी २९ लाख एवढी रक्कम भरणा झालेली आहे.