नवी दिल्ली : विदेशी चलनांचे बेकायदा व्यवहार झाले आहेत का, याचा शोध सध्या रिझर्व्ह बँक घेत असून त्याचाच एक भाग म्हणून सर्व राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना त्यांनी आपले पूर्ण अंतर्गत हिशेब तपासून घ्यावेत, असे सांगितले आहे. ही तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित आॅडिट समितीला सादर करायचा आहे. गेल्या वर्षी ६,१०० कोटी रुपये आयात व्यवहारांत हाँगकाँगला बेकायदेशीररीत्या पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. बँक आॅफ बडोदाच्या येथील अशोक विहार शाखेत हा चुकीचा व्यवहार झाला होता. माहितीच्या अधिकारातील अर्जाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. विदेशी चलनांच्या व्यवहारात फसवणूक न होण्यासाठी बँकांनी कोणती उपाययोजना केली याची माहिती रिझर्व्ह बँकेला सादर करण्यास या पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. ६,१०० कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालय (ईडी) करीत आहे.