Join us

ऑनलाइन फूड मागवणे महागले! नफा वाढविण्यासाठी कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्क २०% वाढविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 9:37 AM

या कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्कात २० टक्के वाढ केली आहे. त्यानुसार प्लॅटफॉर्म शुल्क आता ६ रुपये झाले आहे. आधी ते ५ रुपये होते. या कंपन्यांनी गेल्या वर्षीपासून प्लॅटफॉर्म शुल्क ग्राहकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली होती.

नवी दिल्ली : स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाइन जेवण पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन जेवण मागवणे महाग झाले आहे. या कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्कात २० टक्के वाढ केली आहे. त्यानुसार प्लॅटफॉर्म शुल्क आता ६ रुपये झाले आहे. आधी ते ५ रुपये होते. या कंपन्यांनी गेल्या वर्षीपासून प्लॅटफॉर्म शुल्क ग्राहकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली होती.

घरपोच पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपला महसूल व नफा वाढविण्यासाठी कंपन्यांना  प्लॅटफॉर्म शुल्क आवश्यक आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यापासून स्विगीने काही वापरकर्त्यांकडून १० रुपये, तर काही वापरकर्त्यांकडून ७ रुपये शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली. वास्तविक सर्व ग्राहकांच्या अंतिम पेमेंटमध्ये प्रत्यक्षात ५ रुपये शुल्क घेतले जात होते.

कॅपिटल माइंडचे सीईओ दीपक शेनॉय यांनी सांगितले की, मी स्विगी व झोमाटोपासून अंतर राखणे सुरू केले आहे आणि त्यामुळे मी खूश आहे. कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केल्याने नेहमी ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांना आता पुन्हा विचार करावा लागणार आहे.

झोमॅटोचे समभाग तेजीत

शुल्कवाढीच्या वृत्तानंतर झोमॅटोच्या समभागांत सोमवारी तेजी पाहायला मिळाली. ३ टक्के तेजीसह कंपनीचा समभाग २३२ रुपयांवर गेला.

झोमॅटो कंपनीचे बाजारभांडवलही वाढून २,००,९९० कोटी रुपये (२ ट्रिलियन) इतके झाले आहे. झोमॅटोचे संस्थापक तथा सीईओ दिपिंदर गोयल यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर झाली आहे.

टॅग्स :झोमॅटो