लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एप्रिल २०२४ मध्ये सेवा क्षेत्रातील वृद्धी थोडी कमी झाली असली तरी नवीन व्यवसाय व उत्पादन याबाबतीत सेवा क्षेत्राने तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक गाठला. ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिजनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमध्ये किंचित घसरून ६०.८ अंकांवर आला. मार्चमध्ये तो ६१.२ अंकांवर होता. ५० अंकांपेक्षा अधिक पीएमआय वृद्धी, तर त्यापेक्षा कमी घसरण दर्शवितो.
‘एचएसबीसी’च्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी म्हटले की, सेवा क्षेत्राची वृद्धी धिमी झाली असली, तरी नवीन ऑर्डर्समधील वाढीमुळे वृद्धीला समर्थन मिळाले. नवीन ऑर्डर्स वाढल्यामुळे कंपन्यांनी कर्मचारी संख्येत वाढ केली आहे.
वाढत्या खर्चाची ग्राहकांना झळ
वेतनाचा वाढता खर्च आणि उच्च खाद्य किमती यामुळे कंपन्यांवरील बोजा एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. हा भार कंपन्यांनी अंशत: ग्राहकांकडे हस्तांतरित केल्याचे दिसत आहे. आगामी वर्षाच्या बाबतीत सेवादातांचा विश्वास वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे.
‘एचएसबीसी इंडिया कंपोजिट पीएमआय आउटपुट इंडेक्स’ मार्चमध्ये ६१.८ अंकांवर होता. तो एप्रिलमध्ये घटून ६१.५ वर आला. ही नवी आकडेवारी १४ वर्षांपूर्वीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. खासगी क्षेत्रात विस्ताराचे संकेत यातून मिळत आहेत.