मुंबई : दोन दिवसांपूर्वी ७७ हजारांच्या पुढे गेलेल्या सोन्याच्या भावात गुरुवारी (१७ ऑक्टोबर) २०० रुपयांची घसरण झाली. मात्र शुक्रवारी त्यात थेट ८०० रुपयांची वाढ होऊन सोने ७७ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. जीएसटीसह एक तोळ्यासाठी आता ८० हजार २३७ रुपये मोजावे लागणार आहे.
युक्रेन-रशिया युद्धामुळे सोने- चांदीसह अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर अमेरिकन बँकांच्या स्थितीमुळे सोने- चांदी चांगलेच वधारले, त्या पाठोपाठ आता इराण व इस्त्रायल यांच्यातील वादामुळे सोने दरावर मोठा परिणाम होत आहे. दोन दिवसांपूर्वी बुधवारी (१६ आक्टोबर) सोने भावात एकाच दिवसात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याने ७७ हजारांचा टप्पा ओलांडत ते ७७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते.