Rishabh Pant : यंदाच्या आयपीएल लिलावात अक्षरशः पैशांचा पाऊस पडला असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यातही भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतची आयपीएल २०२५ च्या लिलावात चांदी झाली. लखनौ सुपर जायंट्स म्हणजेच LSG ने तब्बल २७ कोटी रुपये बोलू लावून खरेदी केलं आहे. यासह ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लिलावानंतर पंत चर्चेत आला आहे. त्यासोबतच त्याला विकत घेतलेल्या एलएसजी संघाचे मालक संजीव गोयंका देखील खूप चर्चेत आहेत. पंतवर पाण्यासारखा पैसा खर्च करणारे संजीव गोएंका आहेत तरी कोण? त्यांचा व्यवसाय कुठला? त्यांची नेटवर्थ किती? असे प्रश्न आता गुगलवर सर्च होत आहेत.
संजीव गोयंका यांची नेटवर्थ किती?
संजीव गोयंका हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. ते RPSG समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. संजीव गोयंका यांचा व्यवसाय वीज, उत्पादने, क्रीडा तसेच रिटेल क्षेत्रात पसरलेला आहे. त्यांचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ३३००० कोटी रुपये आहे.
देशातील ६५ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती
संजीव गोयंका यांच्या कंपनीचे मुख्य काम इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन आहे. या व्यतिरिक्त ते इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत, ज्यातून त्यांना भरपूर उत्पन्न मिळते. फोर्ब्सच्या यादीनुसार ते देशातील ६५वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याशिवाय जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत ते ९४९व्या स्थानावर आहेत.
एलएसजीने किती बोली लावली?
लखनौपूर्वी संजीव गोयंका रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते. २०२२ मध्ये जेव्हा नवीन IPL संघांसाठी निविदा जारी करण्यात आली. तेव्हा संजीव गोएंका यांनी LSG ७,०९० कोटी रुपयांना विकत घेतला. यावेळी लिलावात एलएसजीने २७ कोटी रुपये देऊन पंतला आपल्या संघात घेतलं आहे.
संजीव गोएंका यांच्या कंपन्या
संजीव गोयंका यांच्या ग्रुप आरपीजी एंटरप्रायझेसमध्ये वीजपुरवठा, रिटेल तसेच संगीत कंपन्या देखील आहेत. ज्यात CESC, CEAT, स्पेन्सर आणि सारेगामा यांचा समावेश आहे.