विलास गावंडे, यवतमाळ
विद्युत कंपनीतील कामगार, अभियंते, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मेडिकल’ योजना आॅक्सिजनवर आली आहे. केवळ आठ महिन्यांतच निधी संपल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून कामगारांच्या वेतनातून कपात होणारी रक्कम वापरली जात आहे.
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यातील सुमारे १ लाख ३८ हजार कामगार, अभियंते,अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विद्युत कंपनीने ‘मेडिकल’ योजना जानेवारी २०१५ मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पाच व्यक्तींना तीन लाख रुपयांपर्यंतची मदत उपचारासाठी वर्षभरात दिली जाते. एका विमा कंपनीमार्फत ही योजना राबविली जात आहे. यापोटी कंपनीने सदर विमा कंपनीकडे प्रती कुटुंब तीन लाख रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली.
जानेवारी २०१५ मध्ये करार होऊन २० कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा झाली. मात्र दरम्यानच्या काळात कामगार, अभियंते आणि अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जमा रकमेपेक्षा अधिक रक्कम या योजनेतून द्यावी लागली. १८ नोव्हेंबर २०१५ रोजी तर ९० टक्के रक्कम संपली होती. २० कोटी, पाच कोटी विद्युत कंपनीने दिल्यानंतरही उपचार खर्चासाठी मागणी वाढल्याने विमा कंपनीने पुन्हा रकमेची मागणी केली. यानंतर कंपनीने आपला हात आखडता घेतला. कामगारांच्या वेतनातून दरमहा २३० रुपये कपात सुरू केली. जून २०१५ पासून या कपातीपोटी २० कोटी ९७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाले. आता या रकमेतून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उपचाराचा खर्च भागविला जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही कपात सुरू राहणार आहे. मात्र वेळोवेळी उपचाराचा निधी संपत असल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी स्वतंत्रपणे तरतूद करावी लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.
लाभार्थी कामगारांनी कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावे, यासाठीही रुग्णालये निश्चित करण्यात आली.
उपचाराचे देयक कंपनीकडे सादर केल्यानंतर रुग्णालयांना रक्कम प्राप्त होते. ही रक्कम देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर आहे.
विद्युत कंपनीने विमा कंपनीकडे जमा केलेली रक्कम संपल्यामुळे कामगारांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
वीज कामगारांची ‘मेडिकल’ योजना आॅक्सिजनवर
विद्युत कंपनीतील कामगार, अभियंते, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मेडिकल’ योजना आॅक्सिजनवर आली आहे.
By admin | Published: October 2, 2015 11:18 PM2015-10-02T23:18:11+5:302015-10-02T23:18:11+5:30