Valentines Day : देशभरात प्रेमाचा सप्ताह उत्साहात सुरू आहे. बाजारपेठा वेगवेगळ्या भेटवस्तूंनी सजल्या आहेत. पर्यटन स्थळ, सार्वजनिक बागा जोडप्यांनी बहरत आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला असंख्य प्रियकर-प्रेयसी व्हॅलेंटाइन डे साजरा करतील. याकाळात खाजगी वेळ घालवण्यासाठी अनेकजण लॉजिंगचाही आधार घेतात. अशा वेळी ओयो सारख्या कंपनीची चांदी होते. पण, यावेळी व्हॅलेंटाइन डे आधीच कंपनी फॉर्मात आली आहे.
कंपनीचे डिसेंबर तिमाही निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यात कंपनीला तब्बल १६६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा नफा २५ कोटी रुपये होता. यात ६ पटीने वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न १,६९५ कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या १,२९६ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण ३१ टक्के अधिक आहे. ओयोचा EBITDA २४९ कोटी रुपये राहिला आहे. गेल्या वर्षीच्या २०५ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम २२ टक्के अधिक आहे. एकूण बुकिंग मूल्य ३,३४१ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या २,५१० कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण ३३ टक्के अधिक आहे.
गेल्या वर्षी ओयो तोट्यात
ओयोने FY25 च्या पहिल्या ९ महिन्यांत ४५७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गतवर्षी १११ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ओयोने नफा कमावण्याची क्षमता दाखवली आहे. मात्र महसूल वाढीचा प्रश्न होता. त्यानंतर महसूल वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. कंपनीने डिसेंबर तिमाहीत १६६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
ओयोला इतका नफा कसा झाला?
कंपनीतील ही वाढ भारत आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील चांगल्या कामगिरीमुळे आहे. याशिवाय दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य पूर्वेतील उदयोन्मुख बाजारपेठांनीही मदत केली आहे. कंपनीने यासाठी देशांतर्ग प्रीमियम सेवा देण्यास सुरुवात केली. तसेच अमेरिकन हॉटेल कंपनी G6 हॉस्पिटॅलिटी आणि पॅरिसमधील घर भाड्याने देणारी कंपनी चेकमायगेस्ट ताब्यात घेतली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मुडीजने ओयोचे रेटिंग B3 वरून B2 पर्यंत वाढवले आहे. ओयोचा EBITDA FY25-26 मध्ये २० कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल असा मूडीजचा अंदाज आहे. तर गतवर्षी १११ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
व्हॅलेटाईन डे आठवड्यात नफा वाढणार
सध्या देशात व्हॅलेटाईन डे सप्ताह सुरू आहे. या काळात जोडपी आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विचार करतात. अशावेळी प्रायव्हसीसाठी अनेकजण हॉटेलचा पर्याय निवडतात. साहजिकच लॉजिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो. ओयो या क्षेत्रातील मोठा खेळाडू आहे. कंपनीच्या सेवा, ऑनलाईन सेवा यामुळे लोक जास्तीत जास्त ओयो कंपनीची सेवा वापरण्यास प्राधान्य देतात.