Join us  

OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 2:23 PM

OYO IPO: आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे.

OYO IPO: ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म 'ओयो'चा (OYO) आयपीओ येण्याच्या तयारीत होता. मात्र, सेबीकडून या आयपीओला परवानगी मिळू शकली नव्हती. आता ओयो कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीत प्रथमच सकारात्मक रोख प्रवाह नोंदवला आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक आणि समूह मुख्याधिकारी रितेश अग्रवाल यांनी दिली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. त्या आधीच्या वर्षात याच कालावधीत कंपनीला २८० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

ओयो कंपनीच्या युरोपातील घरांच्या व्यवसायात वाढ झाली असून, ग्राहकांनी उन्हाळी सुट्यांसाठी आगाऊ नोंदणी केली. शिवाय जगभरातील सर्वच ठिकाणी हॉटेल आणि खोल्यांसाठी होणाऱ्या नोंदणीमध्ये वाढ झाली असल्याने यंदा कंपनीकडे ९० कोटी रुपयांची गंगाजळी शिल्लक आहे. कंपनीच्या तिमाही अहवालानुसार, तिच्याकडे २,७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध आहे. परिणामी कंपनीला चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

OYO IPO साठी नव्याने प्रस्ताव सादर करणार

प्रारंभिक समभाग विक्रीसाठी पुन्हा नव्याने मसुदा प्रस्ताव सादर करण्याच्या भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या निर्देशानुसार, कंपनीने मार्च महिन्यात नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी ‘आयपीओ’च्या माध्यमातून ८,४३० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा प्रस्ताव (डीआरएचपी) सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीला सादर केला होता. त्यानुसार ७,००० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी करण्याचे तर विद्यमान भागधारकांकडील आंशिक हिस्सा विक्रीच्या माध्यमातून १,४३० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

दरम्यान, ओयोची पॅरेंट कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेड कंपनीनं सेबीकडे ८४३० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. या इशू अंतर्गत कंपनीचा प्लान ७ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करण्याचा होता तर १४३० कोटी रुपये शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमधून विक्री करण्याची योजना होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार