नवी दिल्ली : आयपीओ आणण्यापूर्वी बजेट हॉटेल चेन कंपनी ओयोने (OYO) २०२५ सालासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मेरठमध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घालल्यानंतर, कंपनी आता आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कंपनी देशभरातील प्रमुख आणि धार्मिक स्थळांवर शेकडो हॉटेल्स उघडण्याची योजना आखत आहे. या योजनेमुळे अधिकाधिक भाविकांना राहण्याची चांगली सुविधा मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे. ओयोने बुधवारी सांगितले की, यावर्षी अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, पुरी, हरिद्वार, मथुरा, वृंदावन, अमृतसर, उज्जैन, अजमेर, नाशिक आणि तिरुपती यासारख्या धार्मिक शहरांमध्ये ५०० हॉटेल्स जोडण्याची कंपनीची योजना आहे.
देशात धार्मिक पर्यटन तेजीत असताना कंपनीने ही घोषणा केली आहे. पर्यटन स्थळांवरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. दरम्यान, ओयोने एका निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कंपनीने अयोध्येत १५० हून अधिक, वाराणसीत १०० आणि प्रयागराज, हरिद्वार आणि पुरीमध्ये प्रत्येकी ५० हॉटेल्स जोडणार आहे.
नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी ऑनलाइन सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांच्या यादीत अयोध्या अव्वल स्थानावर आहे आणि एक प्रमुख आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. अशातच अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दर्जेदार राहण्याच्या सुविधांची वाढती मागणी लक्षात घेता, हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ओयो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण जैन म्हणाले की, भाविक आणि पर्यटकांमध्ये उच्च दर्जाच्या खोल्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रमुख धार्मिक केंद्रांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या स्थित हॉटेल्स देण्यावर आमचे लक्ष आहे." दरम्यान, कंपनीला २०२८ पर्यंत धार्मिक पर्यटन उपक्रमांमधून ५९ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे २०३० पर्यंत १४ कोटी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे.