अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये रिव्हर्स चार्जची संकल्पना आहे. ही संकल्पना अगोदर सेवा करामध्येसुद्धा होती, पण नेमके रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे काय?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, रिव्हर्स चार्ज म्हणजे कर भरण्याचे दायित्व हे वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठादारावर नसून, ते वस्तू किंवा सेवेच्या प्राप्तकर्त्यावर असते. म्हणजे सामान्यपणे जेव्हा वस्तू आणि सेवेचा पुरवठा होतो, तेव्हा कर भरण्याची जबाबदारी ही पुरवठादाराची असते, पण जर पुरवठादारच नोंदणीकृत नसेल, तर ती जबाबदारी प्राप्तकर्त्यावर येते आणि त्याला त्याने घेतलेल्या वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीवर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरावा लागतो.अर्जुन : कृष्णा, प्राप्तकर्त्याने जर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरला, तर त्याला त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का?कृष्ण : अर्जुना, नोंदणीकृत व्यक्तीला आवक पुरवठ्यावर भरलेल्या कराचे जसे क्रेडिट मिळते, त्याचप्रमाणे रिव्हर्स चार्जद्वारे भरलेल्या कराचेसुद्धा क्रेडिट मिळेल, परंतु कंपोझिशन स्किममध्ये नोंदणीकृत असलेल्या व्यक्तीला रिव्हर्स चार्जद्वारे भरलेल्या कराचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही.अर्जुन : कृष्णा, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम कोणाकोणाला लागू होतो आणि त्याचे काही अपवाद आहेत का?कृष्ण : अर्जुना, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमची संकल्पना ही भाडे, कमिशन, प्रिंटिंग, स्टेशनरी, रिपेअर्स, कार्यालय आणि वाहन देखरेख, कायदेशिर शुल्क, आॅडिट फी, लेबर चार्जेस, सल्ला आणि व्यावसायिक शुल्क, वाहतूक शुल्क, भेटवस्तू खर्च, प्रमोशन खर्च, जाहिराती इत्यादी सर्वासाठी लागू आहे, परंतु सॅलरी, व्याज, विद्युत, सरकारी शुल्क आणि इंधन या सर्व खर्चांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमची संकल्पना लागू होत नाही.अर्जुन : कृष्णा, रिव्हर्स चार्जसाठी ५ हजारा रुपयांची जी मर्यादा आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती सांग.कृष्ण : अर्जुना, २८ जूनला सरकारने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत दिल्याप्रमाणे जर अनोंदणीकृत व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही घेतल्या आणि त्याचे एका दिवसाचे एकूण मूल्य ५००० रुपयांपेक्षा कमी असले, तर त्या प्राप्तकर्त्याला रिव्हर्स चार्जद्वारे कर भरण्याची गरज नाही. ही अधिसूचना १ जुलै २०१७ पासून लागू झाली. उदा. एखाद्या व्यक्तीने अनेक अनोंदणीकृत व्यापाºयांकडून एका दिवसात ५०० रुपयांचा चहा, ३००० रुपयांची स्टेशनरी आणि १००० रुपयांचे वाहतूक शुल्क या सर्वावर खर्च केला, तर त्या व्यक्तीला रिव्हर्स चार्जद्वारे कर भरण्याची गरज नाही. कारण त्या व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च ५००० रुपयांपेक्षा कमी आहे.अर्जुन : जर ही ५००० रुपयांची मर्यादा ओलांडली तर काय होईल?कृष्ण : अर्जुना, जर अनोंदणीकृत व्यक्तीकडून घेतलेल्या वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीचे एका दिवसाचे एकूण मूल्य ५००० रुपयांपेक्षा जास्त झाले, तर त्या प्राप्तकर्त्याला संपूर्ण रकमेवर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरावा लागेल. उदा. एखाद्या व्यक्तीने अनोंदणीकृत व्यापाºयांकडून एका दिवसात ३००० रुपयांची कार्यालय आणि वाहन देखरेख, २००० रुपयांचे भाडे, ७०० रुपयांचे कमिशन आणि ८०० रुपयांच्या भेटवस्तू खरेदी केल्या, तर त्या व्यक्तीला संपूर्ण रकमेवर म्हणजेच ६,५०० रुपयांवर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरावा लागेल.अर्जुन : कृष्णा, जर एखाद्या नोंदणीकृत व्यक्तीने अनोंदणीकृत पुरवठादाराकडून खरेदी केलेल्या वस्तूंवर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरलाच नाही, तर काय होईल?कृष्ण : अर्जुना, केंद्रीय वस्तू आणि सेवाकर कायद्यात असे सांगितले आहे की, प्राप्तकर्ता जर रिव्हर्स चार्जद्वारे कर भरण्यासाठी जबाबदार असेल, तर त्याला कायद्यातील इतर सर्व तरतुदी, ज्या करपात्र व्यक्तीला लागू आहेत, त्या लागू होतील. कायद्यात दिलेल्या सर्व पेनल्टी, व्याज इत्यादी ज्या कर न भरणाºयाला लागू आहेत, त्या सर्व रिव्हर्स चार्ज न भरणाºयाला लागू होतील.
पाच हजारांची मर्यादा ओलांडली, तर व्हाल बेजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:02 AM