हैदराबाद : इंडियन स्कूल आॅफ बिझनेसच्या (आयएसबी) २०१७ च्या पीजीपीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या प्लेसमेंटमध्ये २२ लाखांच्या वार्षिक पॅकेजचे १११३ प्रस्ताव मिळाले आहे. यात देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४०० पेक्षा अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. येथे येणाऱ्या कंपन्यात (नियोक्ता) ३९ टक्के वाढ झाली आहे. आयएसबीत पोस्ट ग्रॅजुएट प्रोगाम इन मॅनेजमेंटचे (पीजीपी) ९०३ विद्यार्थी आहेत. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण पूर्ण केल्यानंतर, येथील विद्यार्थी व्यावसायिक स्तरावरही यशस्वी ठरलेले आहेत. फाइनान्सियल टाइम्स ग्लोबल एमबीए रँकिंग २०१७च्या आकडेवारीनुसार, येथील अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या वेतनात १६० टक्के वाढ होते. ही संस्था जगातील प्रमुख ३० संस्थांमध्ये अग्रेसर आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मॅककिन्से अँड कंपनी, बीसीजी, पार्थेनॉन, एटी केर्नी, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सिटीबँक, नोवार्टिस, सिमंस, अमेझॉन, कॉग्निजेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यासारख्या नियमित नियोक्ता कंपन्यांशिवाय जोन्स लँग लासेल, हॉवेल्स, रेविगो, पी अँड जी, लेंडिंग कार्ट, रिलायन्स जियो, माइंडट्री कन्सल्टिंग, लॉरियल, बॅन अँड कंपनी आणि रोनाल्ड बर्जर यासारख्या अनेक कंपन्या यंदा प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेश सरकारनेही एकूण २१ प्रस्ताव देत विद्यार्थ्यांची भरती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यकारी सहायक म्हणून या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
आयएसबीच्या विद्यार्थ्यांना २२ लाखांचे पॅकेज
By admin | Published: June 21, 2017 1:23 AM