चेन्नई : उडीद डाळीचे भाव गगनाला भिडल्यामुळे तामिळनाडूतील पापड उद्योग संकटात आला आहे. तामिळनाडूत पापडाचा खप तसेच उत्पादन सर्वाधिक आहे. तामिळनाडूत पापडाला अप्पालम म्हणतात. सर्व प्रकारच्या समारंभात अप्पालम आवश्यकच असतो.उडीद डाळीच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे. तामिळनाडू अप्पालम मॅन्युफॅक्चरिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्रन यांनी सांगितले की, या आधी आम्हाला अशा परिस्थितीचा कधीच सामना करावा लागलेला नाही.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उडीद डाळीची किंमत तब्बल तिप्पट वाढली आहे. गेल्या वर्षी ती ६ हजार रुपये क्विंटल होती. यंदा १८ हजार रुपये क्विंटल झाली आहे. सुरेंद्रन म्हणाले की, किमतीत अचानक वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी भोजनात पापड वाढणेच बंद केले आहे. पापडाऐवजी लोक चिप्स आणि तत्सम वस्तूंना प्राधान्य देत आहेत. पापड उद्योग ७५0 कोटी रुपयांचा आहे. या उद्योगात ३.५0 लाख लोक काम करतात. ५ हजार कंपन्या पापड बनविण्याचे काम करतात.
उडीद डाळ महागल्याने पापड उद्योग संकटात
By admin | Published: October 18, 2015 11:05 PM