पान १- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट केंद्राच्या निर्णयावर राष्ट्रपतींची मोहोर
By admin | Published: September 28, 2014 10:30 PM
जयशंकर गुप्त / नवी दिल्ली
जयशंकर गुप्त / नवी दिल्लीमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीस केवळ १७ दिवस राहिले असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याबाबतच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्याने राजधानी दिल्लीप्रमाणेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही राष्ट्रपती राजवट लागू झाली़ दिल्लीतील विधानसभा तूर्तास निलंबित आहे़ याउलट महाराष्ट्रात येत्या १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत़ गृहमंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी राज्यात राष्ट्रपती लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आपली मोहोर उमटविली़ संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती भवनाने याबाबत कुठलीही अधिसूचना जारी केली नव्हती़ शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली़ या बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या शिफारशीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांची १५ वर्षे जुनी आघाडी तुटली आणि राज्यातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले़ यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला होता़ राज्यातील १५ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका राष्ट्रपती राजवटीतच पार पडणार, हे त्यावेळीच निश्चित झाले होते़ तथापि राज्यात निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यामुळे राज्यपाल आणि त्यांचे प्रतिनिधी धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत़ सोबतच निवडणूक प्रक्रियाही कुठल्याहीप्रकारे प्रभावित करू शकणार नाही़ महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी आणि विरोधातील युती मित्रपक्षांबरोबरच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर तुटली. तरीही केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारमध्ये शिवसेनेचे अनंत गीते अजूनही आहेत. भाजपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यावरून परतल्यानंतर केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व कायम ठेवायचे वा नाही, याबाबत निर्णय अपेक्षित आहे़ तथापि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारमधील शिवसेनेच्या प्रतिनिधीला बाहेरचा रस्ता दाखवला जावा, यासाठी दबाव वाढवला आहे़ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या नात्यांबाबत कुठलाही भ्रम राहू नये, असे नेत्यांचे मत आहे़