नामदेव मोरे
नवी मुंबई : इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारतामध्येही खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका महिन्यात पामतेलाच्या किमतीमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलांच्या भाववाढीमुळे फरसाण, वेफर्स, नूडल्ससह साबण, शाम्पूच्या दरामध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
देशात प्रत्येक वर्षी २०० ते २२५ लाख मे. टन तेलाची गरज आहे. यापैकी जवळपास ६५ टक्के अर्थात जवळपास १५० लाख मे. टन तेल आयात करावे लागत असून, यामध्ये ८० लाख मे. टन पामतेलाचा समावेश आहे. इंडोनेशियातून आयात होणाऱ्या पामतेलाचा वाटा ६५ टक्क्यांवर आहे. इंडोनेशियामध्ये तेलाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्यांनी तेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. एका महिन्यापूर्वी १७० रुपये लिटर दराने विकले जाणारे पामतेल आता १९५ रुपयांवर पोहोचले आहे. दोन वर्षांत पामतेलाच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. इंडोनेशियाने निर्यातबंदी केल्यामुळे मलेशियातून आयात होणाऱ्या तेलावर अवलंबून राहावे लागत आहे.
भारतामध्ये ६५ टक्के पामतेल इंडोनेशियातून आयात होते. इंडोनेशियाने निर्यातबंदी केल्यामुळे आयातीवर परिणाम झाला असून, बाजारभाव वाढले आहेत. पामतेलावर अवलंबून असलेल्या फरसाण, वेफर्सच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. - भरत ठक्कर, आयातदार
दोन वर्षांतील प्रमुख तेलांचे प्रतिलिटरचे दर
तेलाचा प्रकार २०२० २०२२
पामतेल ८० ते ८५ १८० ते १९५
सूर्यफूल ९० ते १०० १९०
शेंगदाणा तेल ११० ते १२० १९०