Pam Kaur Success Story : आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीयांनी जगाला नेहमीच अचंबित केलंय. जगातील अनेक दिग्गज कंपन्यांची जबाबदारी भारतीय व्यक्तीच सांभाळताना पाहायला मिळतात. गुगलमध्ये सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नडेला, ॲडोबमध्ये शंतनू नारायण, आयबीएममध्ये अरविंद कृष्णा ही काही निवडक नावे आहेत. या दिग्गजांच्या पंक्तीत आता एका भारतीय महिलेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या यादीत पाम कौर (Palm Kaur) यांच्या नावाचा समावेश झाला आहे. पाम कौर यांची हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) चे मुख्य वित्तीय अधिकारीपदी (CFO) नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या पाम कौर यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. एचएसबीसीच्या १६० वर्षांच्या इतिहासात पाम कौर या पहिल्या महिला सीएफओ असतील.
कंपनीने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की कंपनीच्या सीएफओ म्हणून पाम कौर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २०२५ रोजी त्या या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कंपनीतील CFO हे पद सध्या तात्पुरते जॉन बिंघम यांच्याकडे आहे. पाम कौर यांना पगार आणि भत्ते म्हणून दरवर्षी सुमारे २१ कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलंय.
११ वर्षात ३ प्रमोशनलंडनमध्ये पतीसोबत राहणाऱ्या पाम कौर यांनी २०१३ मध्ये HSBC मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ऑडिट विभागाच्या प्रमुख म्हणून त्या कंपनीत रुजू झाल्या होत्या. गेल्या ११ वर्षांत ३ प्रमोशननंतर त्या HSBC च्या ग्रुप चीफ रिस्क अँड कम्प्लायन्स ऑफिसर पदी पोहचल्या. पाम कौर यांची नवीन नियुक्ती HSBC च्या अलीकडील नेतृत्वात आणखी एक मोठ्या बदलाची नांदी आहे. HSBC ने आपल्या व्यवसायाच्या रचनेतही महत्त्वाचे बदल केले आहेत. या अंतर्गत इंग्लंड (यूके) आणि हाँगकाँग वगळता इतर देशांचे व्यावसायिक बँकिंग कामकाज जागतिक बँकिंग आणि बाजार व्यवसायाशी जोडले जात आहे. या बदलामुळे पाम कौर यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.
भारतात झालंय शिक्षणभारतातील पंजाब विद्यापीठातून बीकॉम ऑनर्स आणि फायनान्समध्ये एमबीएचे शिक्षण घेतलेल्या पाम कौर यांना जवळपास ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अर्न्स्ट अँड यंग (EY) येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सिटी बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभागातही काम केलं आहे.
या वयातही तंत्रज्ञानाची आवडपाम कौर सध्या ६० वर्षांच्या आहेत. या वयातील लोकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला वेळ लागतो. मात्र, कौर याला अपवाद आहेत. त्यांच्या एका लिंक्डइन पोस्टमध्ये याची चुणूक पाहायला मिळते. त्यांनी लिहिलंय की, “आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. पण, आपण काय शिकतो हे आपल्या हातात आहे. आपल्या सभोवतालचे जग नेहमीपेक्षा वेगाने बदलत आहे. आपण सर्वांनी गतिमान संस्कृतीशी जुळवून घेणे आणि भविष्यासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे.”