Join us  

पान १ - शीना बोरा हत्या प्रकरण

By admin | Published: September 07, 2015 11:27 PM

इंद्राणी-शीनाचे डीएनए जुळले

इंद्राणी-शीनाचे डीएनए जुळले
- आणखी एक भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती
मुंबई : पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीनुसार गागोदे खिंडीतून मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेल्या हाडांचे डीएनए मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीशी जुळले आहेत. यावरून इंद्राणी ही शीनाची बहिण नसून आई होती ही महत्वाची बाबही स्पष्ट झाली आहे.
गागोदे खिंड येथे जाऊन खार पोलिसांनी शीनाचा मृतदेह पुरलेल्या जागी खोदकाम करून कवटी, हाडे असे अवेशष हस्तगत केले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या अवशेषांचा डीएनए काढण्यात आला. तो इंद्राणीच्या रक्तातील डीएनएशी जुळवून पाहिला गेला. या चाचणीत दोन्ही नमुने जुळल्याचा प्राथमिक अहवाल प्रयोगशाळेने पोलिसांना दिला आहे. यानंतर प्रयोगशाळेत सिद्धार्थ व शीना यांचे डीएनए नुमने जुळवून पाहिले जाणार आहेत.
डीएनए चाचणीचा अहवाल हा दुसरा भक्कम आमच्या हाती लागला आहे. शीनाची हत्या झाली तर मृतदेह कुठे आहे हा न्यायालयाकडून किंवा आरोपींच्या वकिलांकडून खटल्यादरम्यान पोलिसांना विचारला जाणारा पहिला प्रश्न होता. मृतदेह न सापडल्याने खटल्यात पोलिसांची बाजू कमकुवत पडते की काय अशी चर्चा होती. मात्र डीएनए चाचणीवरून गागोदे खिंडीत जाळलेला, पुरलेला मृतदेह शीनाचाच होता हे स्पष्ट झाले आहे. हा डीएनए अहवाल आता आरोपींविरोधातला भक्कम पुरावा ठरू शकेल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने लोकमतला सांगितले. शीना आपली बहिण असल्याचा अभास इंद्राणीने उभा केला होता. डीएनए चाचणीवरून ती तिची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधी मुंबई पोलिसांनी गागोदे खिंडीतून हस्तगत केलेल्या कवटी व चेहेर्‍याच्या अन्य हाडे जुळवून त्यावर नायर रूग्णालयात डीजीटल फेशिअल सुपर इम्पोझिशन चाचणी करण्यात आली. या चाचणीतून समोर आलेला चेहेरा हा शीनाच्या छायाचित्राशी जुळला होता.
--------------------
मारिया पुन्हा खार पोलीस ठाण्यात
- पीटर मुखर्जी यांची चौकशी
इंद्राणी मुखर्जी, श्याम राय यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास खार पोलीस ठाणे गाठले. मारियांसोबत सहआयुक्त (कायदा व सुरक्षा) देवेन भारतीही होते. मात्र तत्पूर्वी इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांची खार पोलीस दुपारपासून चौकशी करीत होते. मरिया आणि भारती यांनी पीटर यांच्याकडे मालमत्तेबाबत चौकशी केल्याचे समजते.
------
इंद्राणी भायखळा कारागृहात
वांद्रे दंडाधिकारी न्यायलायाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या इंद्राणीला संध्याकाळी भायखळा येथील महिला कारागृहात बंद करण्यात आले. विशेष म्हणजे घरचे जेवण मिळावे या अर्जावर न्यायालय १० सप्टेंबरला निकाल देण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत तिला कारागृहातील अन्य महिला कैदी जे जेवतात त्याच जेवणावर समाधान मानावे लागणार आहे.