Join us

पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 12:11 PM

अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की,  हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी म्हणून वापरले जातील.

नवी दिल्ली : जर तुम्हीही कुटुंबाचे भविष्य लक्षात घेऊन सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या सर्व योजनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी पॅन कार्ड (PAN CARD) आणि आधार कार्ड (AADHAAR CARD) आवश्यक करण्यात आले आहेत.

यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की,  हे बदल सरकारद्वारे जारी केलेल्या अल्प बचत योजनेसाठी केवायसी म्हणून वापरले जातील. याआधी तुम्ही या सर्व बचत योजनांमध्ये आधार क्रमांक नसतानाही पैसे जमा करू शकत होता. दरम्यान, अर्थ मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले की, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. तसेच, एका मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड दाखवावे लागेल.

सहा महिन्यांच्या आत द्यावा लागेल आधार क्रमांक पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी खाते उघडताना तुमच्याकडे आधार नसल्यास, तुम्हाला आधारसाठी नोंदणी स्लिपचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच, गुंतवणूकदाराला अल्प बचत योजनेच्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी, खाते उघडल्यापासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. आता तुम्हाला अल्प बचत योजना खाते उघडताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

- पासपोर्ट आकाराचा फोटो- आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप- पॅन क्रमांक

- जर सध्याच्या गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले नाही तर त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बॅन केले जाईल. 

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय