लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वित्त कायदा-२0१७नुसार वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांना आपले विवरणपत्र भरण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक एकत्र जोडणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नवा नियम १ जुलै २0१७पासून लागू होणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, ते आधारसाठी नोंदणी करून हा नोंदणी क्रमांक विवरणपत्राला जोडू शकतील. असे असले तरी काही विशिष्ट प्रवर्गातील लोकांना पॅन-आधार जोडणीतून सूटही देण्यात आली आहे. हे लोक या जोडणीशिवायही विवरणपत्र दाखल करू शकतील, असे प्राप्तिकर खात्यातील सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आधार कायदा २0१६नुसार आधार कार्ड मिळण्यास जे पात्र आहेत, अशांनाच प्राप्तिकर विवरणपत्रात आधार क्रमांक नोंदविण्याचे बंधन आहे. या कायद्यानुसार वित्तीय आणि अन्य स्वरूपाची सबसिडी, लाभ आणि सेवा घेणाऱ्यांना आधार कार्ड काढण्याचा हक्क आहे. आधार कायद्यानुसार, जे लोक भारताचे निवासी आहेत, त्यांना आधार कार्ड मिळू शकते. १२ महिन्यांच्या काळापैकी १८२ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जे लोक भारतात राहिले आहेत, त्या सर्व लोकांना आधार क्रमांक मिळवण्याचा अधिकार आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९अअ अन्वये जे लोक भारताचे निवासी नाहीत, त्यांना विवरणपत्रासोबत आधार क्रमांक देण्याची गरज नाही. याशिवाय आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय यांनाही पॅन-आधार जोडणीतून सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जे नागरिक ८0 वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ आहेत, त्यांना ही जोडणी बंधनकारक नाही.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन जोडी बंधनकारक असणाऱ्यांसाठी प्राप्तिकर विभागाने एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट नमुन्यात ५६७६७८ आणि ५६१६१ या क्रमांकावर आधार क्रमांक एसएमएस केल्यास पॅन क्रमांकाला आधार जोडला जाईल, असे प्राप्तिकर विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणी सर्वांसाठीच बंधनकारक नाही
वित्त कायदा-२0१७नुसार वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांना आपले विवरणपत्र भरण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक एकत्र जोडणे बंधनकारक आहे
By admin | Published: June 9, 2017 12:00 AM2017-06-09T00:00:04+5:302017-06-09T00:00:04+5:30