लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढीलवर्षी मार्चअखेरपर्यंत आधार क्रमांकाशी न जोडले गेलेले पॅन क्रमांक निष्क्रिय केले जातील, असे आयकर विभागाने शनिवारी जाहीर केले. आयकर विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या सल्लापत्रात ही घोषणा करण्यात आली आहे.
विभागाने म्हटले की, पॅन क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक आहे. उशीर करू नका. आयकर विभागाने म्हटले की, आयकर कायदा, १९६१ नुसार, सवलतीच्या श्रेणीतील पॅन कार्ड वगळता इतर सर्व पॅन कार्ड ३१ मार्च २०२३ पूर्वी आधारशी जोडणे बंधनकारक आहे. न जोडलेले पॅन क्रमांक १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय होतील.
मे २०१७ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून ‘सवलत श्रेणी’तील व्यक्तींची यादी जारी केली होती. त्यानुसार, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयाचे रहिवासी, आयकर कायदा १९६१ नुसार अनिवासी नागरिक, ८० वर्षांचे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक तसेच भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्ती यांचा या यादीत समावेश आहे. या यादीतील लोकांना पॅन कार्ड आधारशी जोडण्यातून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना आजचे सल्लापत्र लागू नाही.
काय अडचणी येतील?
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशांना आयकर विवरणपत्र भरता येणार नाही. प्रलंबित विवरणपत्रे प्रक्रियान्वित होणार नाहीत. करही वाढीव दराने भरावा लागेल. अशा व्यक्तींना बँका आणि अन्य वित्तीय पोर्टल्समध्येही समस्यांचा सामना करावा लागेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"