नवी दिल्ली : कर चुकविण्यासाठी जगभरातील अतिश्रीमंतांनी परदेशांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची पोलखोल पँडोरा पेपर्स लीकमुळे झाली आहे. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा गौप्यस्फोट केला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता जॅकी श्रॉफ, नीरा राडिया, किरण मजुमदार शॉ यांचे पती, फरार हिरे व्यापारी नीरव मोदीसह ३८० भारतीयांची नावे यात आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचाही यादीत समावेश आहे. दरम्यान, पँडोरा प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. काही उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी यांच्या परदेशात मालमत्ता व गुंतवणूक असल्याचे पँडोरा पेपर्समधून उघड झाले आहे. देशातील ३८० आणि पाकिस्तानातील ७०० नावांचा पँडोरा पेपर्समध्ये उल्लेख आहे. या पेपर्समधून त्यांची करचुकवेगिरी व संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. मात्र, अनेकांनी पँडोराचे दावे फेटाळले आहेत. सचिन तेंडुलकर व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समध्ये (बीव्हीआय) काही कंपन्या होत्या. पनामा पेपर्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर या कंपन्या विकल्याचा दावा पँडोरा पेपर्समधून करण्यात आला आहे. त्यावेळी एका शेअरचे मूल्य ९६ हजार डॉलर्स एवढे होते. सचिन यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत.
पाकिस्तान आणि डी-कंपनी कनेक्शन
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी परदेशात आलिशान मालमत्ता खरेदी केल्याचा दावा पँडोरातून केला आहे. निवृत्त जनरल शेफतउल्ला शाह यांना अकबर आसिफ यांच्या मालकीच्या कंपनीने मालमत्ता हस्तांतरित केली. अकबर यांची बहीण हीना कौसर ही डी-कंपनीतील प्रमुख सदस्य असलेल्या इकबाल मिर्चीची पत्नी आहे.
इकबाल मिर्ची २०१३ मध्ये लंडनमध्ये मरण पावला. पँडोरा पेपर्समध्ये नाव आलेल्या प्रत्येकाची चौकशी करणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
चौकशी होणार
पँडोरामध्ये भारतीयांची नावे उघड झाल्यानंतर विविध तपास यंत्रणांच्या समूहातर्फे चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सीबीडीटीचे अध्यक्ष या चौकशीचे नेतृत्व करतील. सीबीडीटीसह ईडी, आरबीआय, एफआययू या संस्थांचे प्रतिनिधी या समूहात राहणार आहेत.
अनिल अंबानींची गुंतवणूक
अनिल अंबानी यांनी २०२० मध्ये दिवाळखाेरी जाहीर करताना लंडनमधील न्यायालयात स्वत:चे नेटवर्थ शून्य असल्याचे सांगितले हाेते. मात्र, अनिल अंबानी यांनी १.३ अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक लपविल्याचा दावा पँडाेरा पेपर्समधून करण्यात आला आहे. २००७ ते २०१० या कालावधीत बीव्हीए आणि सायप्रस यांसारख्या ठिकाणी १८ कंपन्या स्थापन करण्यात आल्या हाेत्या. मात्र, या सर्व गुंतवणुकीची माहिती संबंधितांना दिल्याचा दावा अनिल अंबानींच्या वकिलांनी केला आहे. नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदीनेही बीव्हीएमध्ये कंपनी स्थापन केल्याचे उघड झाले आहे. अभिनेता जॅकी श्रॉफच्या कुटुंबीयांचेही नाव पँडोरा पेपर्समध्ये आहे. जॅकी श्रॉफच्या कुटुंबीयांनीही आरोप फेटाळले आहेत.
परदेशातीलही काहीजण
अनेक परदेशी नावेही यादीत असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आहेत. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची कॅलिफोर्निया व बीव्हीएमध्ये आलिशान घरे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, प्रसिद्ध पॉप गायिका शकिरा यांच्यासह युरोपमधील माफिया राफेल अमातो यांचीही नावे पँडोराने उघड केली.