Vasundhara Oswal : भारतीय वंशाचे अब्जाधीश पंकज ओसवाल यांच्या मुलीला युगांडामध्ये अटक करण्यात आली आहे. आपली मुलगी वसुंधरा ओसवाल हिला बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला. या प्रकरणी ओसवाल यांनी युगांडाच्या राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आपल्या २६ वर्षीय मुलीला मूलभूत हक्क आणि कुटुंब किंवा कायदेशीर मदत मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. पीआरओ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका वसुंधरा ओसवाल यांना “कॉर्पोरेट आणि राजकीय हेराफेरी” प्रकरणात १ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे.
माजी कर्मचाऱ्याने अडकवले?एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या खोट्या आरोपांमुळे आपल्या मुलीवर ही कारवाई झाल्याचा दावा पंकज ओसवाल यांनी केला आहे. या कर्मचाऱ्याने मौल्यवान वस्तू चोरल्या आणि ओसवाल कुटुंबाला जामीनदार करुन २००,००० डॉलर्सचे कर्ज घेतले.
सुटकेसाठी यूएनकडे धावपंकज ओसवाल यांनी आपल्या मुलीच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली आहे. त्यांनी युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुपसमोर तातडीचे अपील दाखल केले आहे. वसुंधरा यांची अपमानास्पद परिस्थितीत चौकशी करण्यात आली. तिला कायदेशीर सल्ला किंवा तिच्या कुटुंबाशी संपर्क न करता ९० तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
वसुंधरा यांच्या बिनशर्त सुटकेसाठी न्यायालयाचा आदेश आहेत. असं असताना पोलिसांनी खोटे आरोप करुन जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. वसुंधरा यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबीयांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तिला तिचे कुटुंबीय आणि वकील यांच्याशी संपर्क साधू दिला जात नाही. तिचा फोनही तिच्याकडून काढून घेण्यात आला आहे, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आहे. तिला अजूनही बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आलं असून तिच्याविरुद्ध पुरावे नाहीत.