ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची निवड झाली आणि जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांवर पडलेली भारतीय नेतृत्वाची छाप पुन्हा चर्चेत आली. पराग अग्रवाल यांना ट्विटरने साडेसात कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. मग गुगलने सीईओ सुंदर पिचईंना (Sundar Pichai) किती पगार दिला असेल, याची चर्चा रंगू लागली आहे.
सुंदर पिचई हे जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलचे सीईओ आहेत. यासचसोबत ते पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे देखील सीईओ आहेत. Celebrity Net Worth ने पिचईंच्या पगाराचा आकडा समोर आणला आहे. यानुसार पिचईंकडे 600 दशलक्ष डॉलरची संपत्ती आहे. ही भारतीय रुपयांत मोजल्यास जवळपास 45 अब्ज रुपये होते. पिचई मोठ्या काळापासून टेक इंडस्ट्रीमध्ये काम करतात. यामुळे त्यांनी मोठी कमाई केली आहे.
गुगलमध्ये ते एका मोठ्या आणि महत्वाच्या पदावर आहेत. त्यांनी महत्वाच्या प्रोजेक्टवरदेखील काम केलेले आहे. सुंदर पिचईंचा गुगलमधील पगार हा वर्षाला 2 दशलक्ष डॉलर म्हणजेच 15 कोटी रुपये आहे. त्यांना बोनस आणि स्टॉकमधून मोठी कमाई होते. गेल्याच आठवड्यात पिचईंनी कंपनीतच निम्मे शेअर विकले आहेत. 2019 मध्ये ते अल्फाबेटचे सीईओ बनले होते.
पराग यांच्याप्रमाणेच पिचई Stanford University विद्यापीठातून शिकले आहेत. 2004 मध्ये त्यांनी गुगल जॉईन केली होती. ड्राईव्ह, जीमेल, मॅप्ससारखी उत्पादने विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.