मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, अनेकविध कंपन्यांचे IPO सादर होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. यातच आता संरक्षण क्षेत्रातील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीने शुक्रवारी बाजारात जोरदार एंट्री घेतली. एकीकडे बाजारात घसरण होत असताना पारस डिफेन्सच्या शेअर दमदार कामगिरी करत हीट ठरला आहे. नवी मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीचे महाराष्ट्रात दोन प्रकल्प आहेत. (paras defence and space technologies ipo made bumper listing in share market)
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीचा शेअर ४७५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. समभाग विक्री योजनेसाठी कंपनीने प्रती शेअर १७५ रुपये किंमत ठरवली होती. या कंपनीचा आयपीओ ३०४ पटीने सबस्क्राइब झाला. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा ११३ पटीने सबस्क्राइब झाला होता. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रिला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला.
पारस डिफेन्सच्या शेअरमध्ये तेजी
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. मार्केटमध्ये पारस डिफेन्सच्या शेअरचा भाव २२० ते २३० रुपये इतका होता. त्यामुळे प्रत्यक्ष भांडवली बाजारात शेअरची दमदार नोंदणी होणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार, कंपनीच्या शेअरने तशीच कामगिरी केली. शुक्रवारी पारस डिफेन्सचा शेअर बीएसईवर ४७५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. एनएसईवर या शेअरची ४६९ रुपयांवर नोंदणी झाली. १६८ टक्के वाढीव किमतीत त्याची नोंद झाली.
महाराष्ट्रातील एक आघाडीची कंपनी
या कंपनीने काही अत्यंत प्रतिष्ठित संरक्षण कार्यक्रमांसाठी योगदान दिले आहे आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेशन्स अंतर्गत या कंपनीने डिफेन्स अॅप्लिकेशनसाठी अनेक प्रकारच्या हाय परफॉरमन्स कम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, त्याचप्रमाणे सीमारेषेवरील संरक्षणासाठी सबसिस्टिम्स, क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि नौदल अॅप्लिकेशन्सचा पुरठा केला आहे. आताच्या घडीला महाराष्ट्रातील नेरूळ (नवी मुंबई) आणि अंबरनाथ (ठाणे) येथे त्यांचे कारखाने आहेत.
दरम्यान, स्थानिक पातळीवर कंपनीच्या ग्राहकांमध्ये संरक्षण व अवकाश संशोधनात कार्यरत असलेल्या अनेक सरकारी संस्थांपासून ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) आणि हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे; आणि टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड आणि अल्फा डिझाइन टेक्नोलॉजिज लिमिटेड आणि अल्फा डिझाइन टेक्नोलॉजिज लिमिटेडसारख्या खासगी कंपन्यांना उत्पादने आणि उपाययोजना पुरविण्यात येतात. या कंपनीतर्फे अनेक परदेशी कंपन्यांनाही सेवा पुरविली आहे.