मुंबई - मुंबईपोलिसांनीटीआरपी स्कॅमचा पर्दाफाश केल्यानंतर टेलिव्हिजन माध्यमांत खळबळ माजली आहे. त्यानंतर, जाहिरातदार आणि मीडिया एजन्सींकडून या संबंधित टेलिव्हिजनवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. तर, पारले कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पारले जी बिस्कीटाची टीव्हीवरुन जाहिरात केली जाणार नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये माध्यमांत झळकले होते.
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करुन इतरही कंपन्यांनी असा मापदंड ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, टीव्ही न्यूज चॅनेल्संना यातून स्पष्ट संदेश देण्यात येईल की, आपल्या कंटेंटमध्ये बदल गरजेचा आहे, असे बुद्ध यांनी म्हटले.
आक्रमकता आणि सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या चॅनेल्सवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नाही. पारले कंपनीच्या या निर्णयाची सोशल मीडियावर प्रशंसा करण्यात येत असून पारलेचं कौतुक होत आहे. यापूर्वी बजाज कंपनीनेही असाच निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे, पारले कंपनीने बजाज कंपनीचे अनुकरण केल्याचे दिसून येते. तर, पारले व बजाज प्रमाणेच देशातील इतरही कंपन्यानी असा निर्णय घ्यायला पाहिजे, असेही नेटीझन्सनी सूचवले आहे.
दरम्यान, यापूर्वी उद्योगपती आणि बजाज कंपनीचे संचालक राजीव बजाज यांनी तीन न्यूज चॅनेल्संना बॅन केलं आहे. समाजात विष कालवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्या कोणासोबतही आम्ही व्यवहार करु इच्छित नाही. बजाज एक विश्वासपूर्ण ब्रँड असून आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो, असेही राजीव बजाज यांनी म्हटले आहे.
Parle Products has decided not to advertise on news channels that broadcast toxic aggressive content.
— Indian Civil Liberties Union (@ICLU_Ind) October 11, 2020
These channels are not the kinds that the company wants to put money into as it does not favour its target consumer.
It's time more companies join the lead of Bajaj and Parle. pic.twitter.com/LNXr9ytmBF
मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश
‘पैसा फेको तमाशा देखो...’ याप्रमाणे प्रेक्षकांना पैसे देऊन टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. यात, रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ हे तीन चॅनल सहभागी असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी दोन चॅनलच्या मालकांना अटक केली असून, कारवाईचा मोर्चा रिपब्लिक टीव्हीकडे वळवला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी ही माहिती दिली.
टीआरपी म्हणजे काय, कसा ठरवतात?
बीएआरसी एका सेट टॉप बॉक्ससारख्या यंत्राच्या मदतीने टीआरपीसंदर्भातील डाटा गोळा करते. वापरकर्ते कोणत्या वाहिन्या पाहतात, याची नोंद या यंत्राच्या माध्यमातून ठेवली जाते. याच आकडेवारीच्या आधारे टीआरपी निश्चित केला जातो. कोणत्या वाहिन्या सर्वाधिक काळासाठी पाहिल्या जातात, याची आकडेवारी गोळा करून त्याच्या सरासरीच्या आधारे टीआरपी ठरवला जातो.